विशेष मुलाखत: २०२९ पर्यंत देशात १० ‘आयुर्वेदिक एम्स’; जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा डंका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 09:22 IST2026-03-26T09:17:41+5:302026-03-26T09:22:57+5:30

केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्याशी ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी चंद्रशेखर बर्वे यांनी केलेली ही थेट बातचीत...

lokmat special interview prataprao jadhav 10 ayurvedic aiims in the country by 2029 ayurveda impact on the world stage | विशेष मुलाखत: २०२९ पर्यंत देशात १० ‘आयुर्वेदिक एम्स’; जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा डंका!

विशेष मुलाखत: २०२९ पर्यंत देशात १० ‘आयुर्वेदिक एम्स’; जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा डंका!

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  जागतिक स्तरावर आयुर्वेदाची वाढती स्वीकारार्हता आणि औषधांच्या निर्यातीत झालेली नऊपट वाढ लक्षात घेता, केंद्र सरकारने आता या क्षेत्राला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या बरोबरीने नेण्यासाठी कंबर कसली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि औषधांची उपलब्धता यांसारख्या आव्हानांवर मात करत, २०२९ पर्यंत देशात १० नवीन ‘आयुर्वेदिक एम्स’ सुरू करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्याशी ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी चंद्रशेखर बर्वे यांनी केलेली ही थेट बातचीत...

प्रश्न : आयुष मंत्रालय स्थापन होऊन दशक उलटले, तरीही ते सामान्यांच्या आवाक्यात का नाही? 

उत्तर : ‘आयुष’ म्हणजे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुषच्या कामकाजावर बारीक लक्ष आहे. २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालय, नागरी सेवा प्रशिक्षण संस्था (मसुरी) आणि यूपीएससी येथील आयुर्वेदिक सेंटरमधील ओपीडीतील रुग्णांची संख्या ५,१९,४९४ वर पोहोचली आहे. दिल्लीतील एम्समध्ये ५३४४ रुग्ण भरती झाले होते. २०१६ मध्ये ही संख्या अनुक्रमे १,२२,४९१ आणि ८६ होती. संपूर्ण जगाचा कल आयुर्वेदाकडे अधिक वाढला आहे. विविध देशांचे नागरिक ‘आयुष व्हिसा’ आणि ‘पर्यटन व्हिसा’ घेऊन आयुर्वेदिक उपचारांसाठी भारतात येत आहेत.

प्रश्न : कागदावर आकडे मोठे दिसतात; पण प्रत्यक्षात ‘आयुष’ची प्रभावी यंत्रणा गावागावांत कुठे आहे?

उत्तर : सध्या देशभरात १२,५०० आरोग्य मंदिरे आहेत. गाव, तालुका आणि जिल्हा रुग्णालयांत १३,०९४ विभाग कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील १,७८,१६२ डॉक्टरांसह देशात साडेसात लाख डॉक्टर आहेत. जागतिक सेमिनारमध्ये २७ देशांचे आरोग्यमंत्री आणि १२७ देशांचे प्रतिनिधी आले होते. दिल्ली आणि गोवा येथे दोन ‘आयुर्वेदिक एम्स’ आहेत. बजेटमध्ये तीन एम्सची घोषणा केली आहे आणि २०१९ पर्यंत दहा एम्स सुरू करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. आयुषने काढलेल्या ‘आजारनिहाय योग’ कॉमिक्सचे रशियाने रशियनमध्ये भाषांतर करून मागितले आहे. १५ देशांमध्ये ‘आयुष’ची चेअर आहे. आयुर्वेदिक औषधांची निर्यात नऊ पटीने वाढली आहे.

प्रश्न : महाराष्ट्राला हक्काचे ‘आयुर्वेदिक एम्स’ नक्की कधी मिळणार?  

उत्तर : हा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांचा आहे. परंतु, महाराष्ट्राला एक ‘एम्स’ मिळावे, अशी आमची इच्छा आहे. १६ राज्यांचे  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशातील ४५ खासदारांनी ‘एम्स’साठी पत्र लिहिले आहे.

प्रश्न : कॅन्सर किंवा हार्ट अटॅकच्या आपत्कालीन स्थितीत आयुर्वेद खरोखरच ‘लाइफ सेव्हर’ ठरू शकतो का?

उत्तर : आयुर्वेदामध्ये हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड आणि कर्करोगासह सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. याचे परिणामही अत्यंत समाधानकारक असतात. आता आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून औषधांची निर्मिती केली जाते.

प्रश्न : कमी बजेट आणि मर्यादित सोयी, अशा स्थितीत आयुर्वेद जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न पूर्ण होईल का?

उत्तर : मुद्दा केवळ बजेटचा नसून त्याच्या प्रभावी विनियोगाचा आहे. यंदाच्या ४,४०० कोटींच्या निधीतून आम्ही केवळ इमारती नाही, तर दर्जेदार पायाभूत सुविधांचे जाळे विणत आहोत. एकेकाळी मेडिकल प्रवेशासाठी ‘तिसरा पर्याय’ मानला जाणारा बीएएमएस अभ्यासक्रम आज एमबीबीएसनंतर विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरत आहे. ही बदललेली मानसिकता आणि वाढलेली विश्वासार्हता हेच आयुर्वेदाच्या उज्ज्वल भविष्याचे निदर्शक आहे.

Web Title : 2029 तक दस आयुर्वेदिक एम्स: आयुर्वेद का वैश्विक प्रभाव!

Web Summary : भारत का लक्ष्य 2029 तक दस नए 'आयुर्वेदिक एम्स' स्थापित करना है, जिससे वैश्विक स्वीकृति बढ़ेगी। सरकार डॉक्टरों की कमी जैसी चुनौतियों का समाधान करती है, बुनियादी ढांचे और गुणवत्ता पर ध्यान केंद्रित करती है। आयुर्वेदिक चिकित्सा में वैश्विक रुचि बढ़ी है, निर्यात और वीजा आवेदन बढ़ रहे हैं।

Web Title : Ten Ayurvedic AIIMS by 2029: Ayurveda's Global Impact Amplified!

Web Summary : India aims to establish ten new 'Ayurvedic AIIMS' by 2029, boosting global acceptance. The government addresses challenges like doctor shortages, focusing on infrastructure and quality. Ayurvedic medicine sees increased global interest, with rising exports and visa applications for treatments.