“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:42 IST2025-12-17T17:40:03+5:302025-12-17T17:42:55+5:30

Lokmat National Conclave 2025: विरोधकांकडून निवडणूक आयुक्तांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना माजी निवडणूक आयुक्तांनी मोठे विधान केले. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते.

lokmat national conclave 2025 former election commissioner dr qureshi said that sir process unnecessary | “SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले

“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले

Lokmat National Conclave 2025: आताच्या घडीला देशातील अनेक राज्यांमध्ये मतदारयाद्या पुनरीक्षण प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेवरून विरोधक केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. तर या प्रक्रियेच्या तणावामुळे काही जणांनी जीवन संपवल्याच्या घटनाही समोर आल्या. या प्रकरणी सर्वोच्च न्यालालयात सुनावणी सुरू असून, अनेक महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. याच SIR प्रक्रियेबाबत माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगालाच कानपिचक्या दिल्या.

लोकमत समूहातर्फे दिल्लीत आयोजित पाचव्या नॅशनल कॉन्कक्लेव्हमध्ये संवैधानिक संस्थांपुढील आव्हाने या चर्चासत्रात बोलताना माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी सविस्तर भाष्य केले. निवडणूक आयोगावर कोणतीही टीका होते, तेव्हा मला अतिशय दुःख होते, वेदना होतात आणि कुणीतरी जोरात फटकारल्यासारखे वाटते. एक काळ होता, जेव्हा निवडणूक आयोगाची प्रतिमा सर्वोच्च पातळीवर होती. परंतु, आताच्या काळात ती मलिन झालेली आहे. ही जनतेची प्रतिक्रिया आहे. मी त्या व्यवस्थेचा भाग होतो किंवा माझ्या काळात काय झाले, ही वेगळी बाब आहे. माजी सरन्यायाधीश जे. एस. वर्मा यांनी जाहीररित्या तीन ते चार वेळा एक विधान केले होते. त्या विधानाने मला आश्चर्याचा धक्का बसला होता. देशात दोनच अशा सर्वाधिक विश्वासार्ह संस्था होत्या, एक म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरी न्यायव्यवस्था. मला सांगताना अतिशय आनंद होतो की, त्यातील एकच आता शिल्लक राहिलेली आहे. त्यांचा म्हणण्याचा रोख हा निवडणूक आयोगाकडे होता, अशी एक आठवण कुरेशी यांनी सांगितली.

आताची SIR प्रक्रिया अनावश्यक अन् लोकांचा छळ करणारी 

देशात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेवर बोलताना माजी निवडणूक आयुक्त कुरेशी म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून आताच्या घडीला सुरू असलेली SIR ची प्रक्रिया अनावश्यक आणि लोकांचे शोषण करणारी आहे. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत ज्या मतदारयाद्या योग्य होत्या, ज्या मतदारयाद्यांच्या आधारावर देशातील मागच्या जून महिन्यात लोकसभा निवडणूक झाली आणि नवीन सरकार स्थापन झाले, त्याच मतदारयाद्यांना तुम्ही आता कचऱ्याच्या टोपल्यात टाकल्यात, असा विरोधाभास कुरेशी यांनी अधोरेखित केला.

मतदारयाद्यांमध्ये ९९ टक्के अचूकता येण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी 

मतदारयाद्यांमध्ये ९९ टक्के अचूकता येण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागला. सन २००३ ला बिहारमध्ये SIR प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळेस असलेल्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले होते की, आता यापुढे भविष्यात SIR प्रतिक्रिया राबवावी लागणार नाही, कारण मतदारयाद्या डिजिटल स्वरुपात येतील. असे ठरवण्यात आले की, आम्ही मतदारयाद्या घेऊन तुमच्याकडे येऊ. तुमच्या घराचा पत्ता, कुटुंबातील व्यक्ती, मतदारांची संख्या यांची माहिती देऊ आणि तुम्हाला त्यावर काही आक्षेप आहे का, ते तपासू. त्यावेळेस तुम्हाला काही बदल करायचे असतील, तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मतदारयाद्या अचूक करण्यासाठी पावले उचलली जातील. परंतु, आता सुमारे ८ कोटी लोक या प्रक्रियेसाठी वणवण करत आहेत. आता ते परदेशी नागरिकांचा शोध घेत आहेत. या सगळ्या प्रक्रियेत केवळ ५०० परदेशी नागरिक आढळून आले. त्यातील १५० बांगलादेशचे होते आणि ३५० नेपाळी हिंदू महिल्या आढळल्या, ज्या लग्न करून आल्या होत्या. १५० परदेशी लोक शोधण्यासाठी तुम्ही ८ कोटी लोकांचा छळ करण्यात आला. याला काही अर्थ नाही, या शब्दांत कुरेशी यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान,  विरोधकांकडून निवडणूक आयुक्तांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना कुरेशी यांनी सांगितले की, विरोधकांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या काळातही शिष्टमंडळे यायची. तेव्हाचे सरकार एवढे पॉवरफूल होते की, आम्ही आणि विरोधक नेहमीच नजरेत असायचो. माझ्या सहा वर्षाच्या कार्यकाळात भाजपाचे म्हणणे मी ऐकून घेतले. त्यांच्या तक्रारीवरून ज्या काँग्रेस सरकारने मला नियुक्त केले होते, त्यांच्या तत्कालीन चार मंत्र्यांवर कारवाई केली,  त्यातील एक कायदा मंत्री होते, ज्यांनी माझ्या नियुक्ती पत्रावर सही केली होती, हे विसरून चालणार नाही. अशा प्रकारची तटस्थ भूमिका तेव्हा घेतली होत होती. आताही तशीच अपेक्षा केली जाते, असे कुरेशी म्हणाले.

Web Title : पूर्व चुनाव आयुक्त ने SIR प्रक्रिया को बताया निरर्थक: उत्पीड़न

Web Summary : पूर्व चुनाव आयुक्त कुरैशी ने एसआईआर प्रक्रिया को अनावश्यक उत्पीड़न बताया। उन्होंने कुछ विदेशियों के लिए करोड़ों लोगों को परेशान करने की आवश्यकता पर सवाल उठाया और वर्तमान दृष्टिकोण की समीक्षा करने का आग्रह किया।

Web Title : Ex-Election Commissioner Slams SIR Process: Harassment for Few Foreigners.

Web Summary : Former Election Commissioner Quraishi criticizes the SIR process as unnecessary harassment. He questions the need to inconvenience crores for a few foreigners, highlighting inaccuracies and urging a review of the current approach.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.