तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:08 IST2025-10-14T14:07:50+5:302025-10-14T14:08:46+5:30
लोकमत दीपोत्सव २०२५ : दिवाळी अंक नव्हे उत्सव, वाचा आसाममधल्या काळ्या जादूची भयानक थरारक गोष्ट

तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
मेघना ढोके ( संपादक, लोकमतसखी.कॉम)
‘लोकमत दीपोत्सव’च्या अंकात ‘मायोंग’ या विषयावर मी लिहिले आहे, हे कळल्यावर मला आणि माझ्यासोबतचा फोटोग्राफर सहकारी प्रशांतला अनेकांनी एकच प्रश्न विचारला, ‘तुम्हाला भीती नाही वाटली?’ मायोंग हे ‘ब्लॅक मॅजिक’साठी प्रसिद्ध असलेलं आसाममधलं गूढ गाव. तिथे कसली काळी जादू होते, हे शोधण्याची प्रचंड उत्सुकताच तर आम्हाला ब्रह्मपुत्रच्या काठी घेऊन गेली. यापूर्वीही एकदा एका प्रवासात मायोंगला धावती भेट देऊन आले होते; पण चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेलं ते गाव तेव्हा काही मला मनापासून भेटलं नव्हतं. नितांत सुंदर जागा. भूल पडावी, चकवा लागावा इतकी भीषण देखणी-विलक्षण. हे काळी जादू करणारं गाव, जादूटोणा, तंत्रमंत्र, जारणमारण करणारं गाव.. गूगल करून बघावं तर काहीबाही भयप्रद कहाण्या भेटतात या गावाच्या. कुणी म्हणतं, या गावात रातोरात आयुष्य बदलून टाकण्याची, वश करण्याची जादू आहे. सुपरनॅचरल पॉवर्स असतात. त्यांना वश करून सत्ताप्राप्तीपासून नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला गायब करण्यापर्यंत काय वाट्टेल ते करता येऊ शकतं.
असं कसं असेल? आजच्या विज्ञानयुगात हे असे दावे कसे काय करू शकतं कुणी? आणि लोक तरी कसे भुलतात? माणसाला दैवी शक्ती, अमानवीय शक्ती, जादू याचं इतकं अप्रूप का वाटत असेल? कोण असतील हे ‘काळी जादू’ करणारे लोक? खरंच आत्मिक ऊर्जा इतकी वाढत असेल का, की मनोबलावर माणूस वाट्टेल त्या देवतेला प्रसन्न करून घेऊ शकत असेल?
प्रश्न अनेक होते. आम्ही ठरवलं आपण उत्तरांच्या नाही, माणसांच्या शोधात जायचं.. या जादूच्या गावातली हाडामासाची माणसं शोधायची.
मायोंगची माणसं. खूप भेटली या प्रवासात. त्यांच्यासोबत राहिलो आम्ही. जेवलं-खाल्लं. गप्पा केल्या. त्यातल्या अनेकांच्या घरात गेल्या कित्येक वर्षांपूर्वीच्या पोथ्या आहेत. स्थानिक भाषेत ‘पुथ्या’. चौदाव्या शतकापासून तत्कालीन आसामीत लिहिलेले काही तंत्रमंत्र आहेत. घरोघर पुथ्या जपलेल्या दिसतात. तीच गुप्तविद्या. गावात गेलं तर कुणीच म्हणत नाही की ‘मी मोठा तांत्रिक आहे’ किंवा ‘मला मोठी विद्या वश आहे...’ मला काहीच फारसं येत नाही, येतं होतं आठवत नाही असं सांगणारेच अनेक भेटले. त्यांना ‘जे’ येत होतं ते अनेकांनी त्यांच्या मुलांना शिकवलेलंच नाही. उलट मोठे जाणते कौतुकानं सांगतात की, अमक्याची मुलगी डॉक्टर होणार आहे, ती इंग्लंडला शिकते, तमक्याचा लेक बंगळुरुत काम करतो, आणि त्या अजून कुणाचा मुलगा तर गुवाहाटीत मोठा फोटोग्राफर आहे. तंत्रमंत्राचा वारसा सांगणाऱ्या घरातली अनेक मुलं नव्या जगाचा हात धरून कधीच मायोंगबाहेर पडली आहेत. गावात जे आहेत, त्यांच्याही हाती आहेतच की, मोबाइल आणि त्यावरचं रीलचं जग.
मग आजच्या मायोंगमध्ये आहे कुठे ती काळी जादू? तंत्रमंत्र? त्यासाठीची साधना?
चारहीबाजूनं पाण्यानं वेढलेलं आहे हे गाव. बुरा मायोंगच्या जंगलात भटकताना प्राचीन खाणाखुणा दिसतात. कुठं बळी दिले जायचे त्या जागा भेटतात. कुठं कासवं, कुठं विविध प्रकारची चक्रं, कुठं तर मंत्र कोरलेला शिलालेखही.. आणि जवळच्या पोबितारा अभयारण्यातले एकशिंगी गेंडे आणि म्हशी..
मायोंगमधले ‘बेझ’ शोधलेच आम्ही. म्हणजे भगत. त्यांच्या घरासमोर माणसांची ही गर्दी असते. प्रत्येक चेहऱ्यावर तीव्र चिंता आणि वेदना असते.. काय शोधत येतात मायोंगमध्ये ती माणसं, आणि मायोंगमधले बेझ त्यांना नेमकं काय देतात?
- तेच वाचा यंदाच्या ‘लोकमत दीपोत्सव’ या दिवाळी अंकात!
मायोंग.. काळी जादू करणारं नितांत सुंदर गाव... आणि त्या गावाची कहाणी!