वेळेआधीच होणार लोकसभेच्या निवडणुका, विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी नितीश कुमारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 21:05 IST2023-06-14T21:03:43+5:302023-06-14T21:05:24+5:30
Lok Sabha elections : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक सूचक विधान केलं आहे. आगामी लोकसभेची निवडणूक ही नियोजित वेळेपूर्वी होण्याची शक्यता नितीश कुमार यांनी वर्तवली आहे.

वेळेआधीच होणार लोकसभेच्या निवडणुका, विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी नितीश कुमारांचं मोठं विधान
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुढाकार घेऊन मोर्चेबांधणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्षांची २३ जून रोजी महत्त्वाची बैठक होत आहे. यादरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक सूचक विधान केलं आहे. आगामी लोकसभेची निवडणूक ही नियोजित वेळेपूर्वी होण्याची शक्यता नितीश कुमार यांनी वर्तवली आहे.
विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमात बोलताना नितीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना सर्व योजनांचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक ही पुढील वर्षी होईल असंच काही नाही. कदाचित या वर्षाच्या अखेरीसही निवडणुका होऊ शकतात.
ग्रामीण कार्य विभागाच्या योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमात बोलताना नितीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देताना सांगितले की, आम्ही आधीपासून सांगतोय की, जरा घाई करा. जेवढ लवकर काम करता येईल तेवढं चांगलं आहे. कधी निवडणूक होईल, कुणाला ठावूक आहे काय? पुढच्या वर्षीच निवडणूक होईल, हे काही आवश्यक नाही. कदाचित नियोजित वेळेच्या आधीच निवडणुका होतील. त्यामुळेच लवकर काम करा.