काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; आज फायनल होणार उमेदवारांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 22:02 IST2024-03-07T21:58:41+5:302024-03-07T22:02:46+5:30
Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक झाली.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; आज फायनल होणार उमेदवारांची नावे
Congress Election Committee Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (7 मार्च) राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत 10 राज्यांतील 60 लोकसभा जागांवर चर्चा झाली. ईशान्येकडील राज्यातील जागांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान्येकडील ज्या पाच जागांबाबत निर्णय झाला आहे, त्यात मेघालयातील दोन, मणिपूरमधील दोन, सिक्कीममधील एक, नागालँड आणि त्रिपुरातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या सर्वांवरील उमेदवारांची नावे पक्षाकडून निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय, काँग्रेसचे दक्षिण भारतावर विशेष लक्ष असल्यामुळे तेथील उमेदवारांबाबतही लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
#WATCH | Delhi | Congress CEC meets to select candidates for Lok Sabha elections pic.twitter.com/eqLkbakWkm
— ANI (@ANI) March 7, 2024
सध्या 10 राज्यांसाठी 60 उमेदवारांच्या नावांवर निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या दहा राज्यांमध्ये दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या जागेचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील जागावाटपाबाबत काँग्रेसला अद्याप अंतिम तोडगा काढता आलेला नाही. पण, लवकरच येथील जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
यूपीमध्ये आघाडीबाबत चर्चेला उशीर झाल्यामुळे अमेठी आणि रायबरेलीबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या दोन जागांवर राहुल आणि प्रियंका गांधी लढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीतील आघाडीचा निर्णय झाल्यामुळे येथील तीन उमेदवार आज निश्चित होणार आहेत. तिकडे, त्रिपुरामध्ये सीपीएम इंडिया आघाडीचा भाग असल्यामुळे काँग्रेसने सीपीएमला एक जागा दिली आहे.