lok sabha election results 2019 live today bjp pm narendra modi | आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहतील; 'तुफानी' विजयानंतर नरेंद्र मोदींचा निर्धार
आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहतील; 'तुफानी' विजयानंतर नरेंद्र मोदींचा निर्धार

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून मिळवलेल्या विजयानंतर जनतेला संबोधित केलं आहे. मोदी म्हणाले, नव्या भारतासाठी हा जनादेश मिळाला आहे. देशाच्या कोटी कोटी नागरिकांनी या फकीरची झोळी भरली आहे. जगातली ही सर्वात मोठी घटना आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाची अखंडता गरजेची आहे. आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहणार आहेत. त्यात एक गरीब असतील, तर दुसरी जात ही गरिबीतून मुक्त करणाऱ्यांसाठी काही ना काही योगदान देणाऱ्याची असेल, असंही मोदी म्हणाले आहेत. निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणांना लोकशाही व्यवस्था सृदृढ करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया शांततारीत्या राबवण्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 130 कोटी नागरिकांनी, जनता जनार्दनानं आम्हाला पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. 

पुढे मोदी म्हणाले, स्वतः मेघराज या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी आले आहेत. या देशातील नागरिकांना मान झुकवून मी नमन करतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात बऱ्याच लोकसभा निवडणुका झाल्या, पण या वेळी सर्वाधिक मतदान झालं. भारतीय नागरिकांची लोकशाहीप्रति असलेली बांधिलकी यातून व्यक्त होत आहे. भगवान कृष्णासारखा देश उभा आहे. जनतेनं कृष्णासारखं उत्तर दिलं आहे. हा भारताचा विजय आहे. या निवडणुकीत जर कोणी विजयी झालं असेल तर तो भारत असेल. भाजपा संविधान आणि घटनेच्या संरचनेप्रति आम्ही कटिबद्ध आहोत.


या निवडणुकीत अनेक चढ-उतार आले, पण आम्ही विनम्रता आणि आदर्शाचा त्याग केलेला नाही. ही निवडणूक कोणताही पक्ष लढत नव्हता, कोणताही उमेदवार लढत नव्हता, कोणताही नेता लढत नव्हता, तर ही निवडणूक देशाची जनता लढत होती. ही लोकशाही बळकट करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, त्यांच्याप्रति मी आभार व्यक्त करतो. आता राजकीय पंडितांना आपली विचारधारा बदलावी लागणार आहे. सध्या 21वं शतक सुरू असून, हा मोदींचा नव्हे, प्रामाणिकपणाचा विजय आहे. आम्ही कधीही मार्गावरून भरकटलो नाही.
आदर्शांचा कधीही त्याग केलेला नाही. ना थांबलो, ना वाकलो अन् थकलोसुद्धा नाही. 2014 ते 2019मध्ये धर्मनिरपेक्षतेवर बोलणाऱ्यांचा आवाज बंद झाला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कोणताही पक्ष जनतेची दिशाभूल करू शकलेला नाही. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाची अखंडता गरजेची आहे. 2024पूर्वीच देशाला प्रगतिपथावर न्यायचा निर्धारही मोदींनी बोलून दाखवला आहे. 


Web Title: lok sabha election results 2019 live today bjp pm narendra modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.