तृणमूलनंतर आता डाव्यांचा काँग्रेसला धक्का; चर्चा न करता जाहीर केले 16 जागांवर उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 21:46 IST2024-03-14T21:46:10+5:302024-03-14T21:46:23+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी माकपा नेतृत्वातील डाव्या आघाडीने गुरुवारी आपले उमेदवार जाहीर केले.

तृणमूलनंतर आता डाव्यांचा काँग्रेसला धक्का; चर्चा न करता जाहीर केले 16 जागांवर उमेदवार
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसलापश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनंतर आणखी एका पक्षाने मोठा धक्का दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने गुरुवारी काँग्रेसशी चर्चा न करता आपल्या 16 उमेदवारांची घोषणा केली. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या 42 उमेदवारांची नावे जाहीर केली होती.
सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने इंडिया आघाडीची मुठ बांधली. पण, एक एक करत यातील पक्ष आघाडीतून बाहेर पडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, टीएमसी आणि डाव्यांची आघाडी होण्याची शक्यता होती. पण, आधी टीएमसी आणि आता डाव्यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दोन जागांची ऑफर देऊ केली होती, पण काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या. यामुळे ममतांनी राज्यात स्वबळाचा मार्ग स्वीकारत 42 जागांसाठी उमेदवार जाहीर केले.
दुसरीकडे, डाव्या पक्षांनीही काँग्रेसशी चर्चा न करता 16 जागांवर उमेदवार जाहीर केले. उर्वरित जागांवर दोन दिवसांनी निर्णय होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. डाव्यांच्या या भूमिकेवरून काँग्रेससोबत जागावाटपावर आजतागायत एकमत झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमन बसू म्हणाले की, बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याशी जागावाटपाबाबतची चर्चा अनिर्णित राहिली. पण, अजूनही जागावाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा करण्यासाठी काँग्रेससाठी दरवाजे खुले आहेत. काँग्रेसने योग्य प्रस्ताव आणल्यास तडजोड होऊ शकते.