२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा किती जागा लढवणार? अशी आहे आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 14:31 IST2024-01-06T14:30:53+5:302024-01-06T14:31:34+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा किती जागा लढवणार? अशी आहे आकडेवारी
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळवण्याचं लक्ष्य भाजपाने आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यामुळे भाजपा या निवडणुकीत किती जागा लढवणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. दरम्यान, भाजपाने जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला असून, त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपा यावेळी मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत एनडीएच्या माध्यमातून सोबत असलेल्या पक्षांपैकी अनेक मोठ्या पक्षांनी भाजपाची साथ सोडली आहे. जेडीयू, शिवसेना, अण्णा द्रमुक, अकाली दल हे मित्रपक्ष भाजपाला सोडून गेले आहेत. त्यामुळे भाजपाला अधिकाधिक जागांवर लढावे लागणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट, कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर असे काही मित्रपक्ष भाजपाला मिळालेले आहेत. मात्र या मित्रपक्षांना काही जागा सोडूनही आपला जनाधार वाढवण्याची संधी भाजपाकडे असणार आहे.
भाजपाने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात कमी २२५ उमेदवार हे १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उतरवले होते. तर सर्वाधिक ४७७ उमेदवारांना १९९१ मध्ये उमेदवारी दिली होती. पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा आकडा कमी होत गेला होता. १९९९ मध्ये भाजपाने ३३९ जागांवर निवडणूक लढवून त्यातील १८२ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवताना २८२ जागा जिंकल्या होत्या. केंद्रात स्पष्ट बहुमत मिळवण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ होती. तर २०१९ मध्ये भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवताना ३०३ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट हा तब्बल ६९.५ टक्क्यांवर पोहोचला होता.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या विजयाची सरासरी ही २०१४ पेक्षाही अधिक होती. २०१४ मध्ये भाजपाने ४२८ तर २०२९ मध्ये ४३६ जागा लढवल्या होत्या. म्हणजेच २०१४ च्या तुलनेत भाजपाने ८ जागा लढवल्या होत्या. तर २१ अधिक जागा जिकंल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपा २०१९ च्या तुलनेत अधिक जागा लढवणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र त्याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच अधिकाधिक जागा स्वबळावर जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल.