आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा करणार मोठी खेळी, २०१९ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आखली अशी रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:36 IST2024-01-10T16:35:48+5:302024-01-10T16:36:34+5:30
Lok sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे.

आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा करणार मोठी खेळी, २०१९ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आखली अशी रणनीती
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, २०१९ च्या तुलनेत भाजपा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी भाजपा आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करू शकतो. भाजपा आपल्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नावांचा समावेश करू शकतो.
२०१९ मध्येही भाजपाने आपल्या पहिल्या यादीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांची उमेदवारी जाहीर केली होती. भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये पक्षाने आतापर्यंत कधीही न जिंकलेल्या आणि २०१९ मध्ये अत्यंत कमी फरकाने जिंकलेल्या १६४ जागांचाही समावेश असेल. गेल्या दोन वर्षांपासून भाजपाकडून अशा जागांवर लक्ष्य केंद्रित करून मेहनत घेतली जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ५४३ पैकी ४३६ जागांवर निवडणूक लढवली होती. तसेत त्यापैकी ३०३ जागांवर विजय मिळवला होता. तर १३३ जागांवर भाजपाचा पराभव झाला होता. त्याबरोबरच पक्ष कमकुवत असलेल्या ३१ जागा अशा मिळून १६४ जागांची यादी करून केंद्रीय मंत्री आणि इतर बड्या नेत्यांकडे या जागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी घेतलेल्या नेत्यांमध्ये अमित शाह यांचाही समावेश आहे.
भाजपाने या जागांना सी आणि डी गटात विभागलं आहे. त्यात प्रत्येकी ८० जागांच्या दोन श्रेणी बनवण्यात आल्या आहेत. ४५ मंत्र्यांकडे या जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक मंत्र्याकडे दोन किंवा तीन जागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये काही बड्या मित्रपक्षांनी भाजपाची सोडलेली साथ हे त्यामागचं महत्त्वाचं कारणं आहे.
भाजपा २०१९ मध्ये पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, बिहारमध्ये जेडीयू, महाराष्ट्रामध्ये शिवसेना, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक या पक्षांना सोबत घेऊन लढला होता. मात्र आता या मित्रपक्षांनी भाजपाची साथ सोडली आहे. त्यामुळे या राज्यांत भाजपाला अधिकाधिक जागा लढता येतील. २०१९ मध्ये भाजपाने पंजाबमधील १३ पैकी ३, महाराष्ट्रात ४८ पैकी २५, बिहारमध्ये ४० पैकी १७ तर तामिळनाडूमध्ये ३९ पैकी ५ जागांवर निवडणूक लढवली होती.