पश्चिम बंगालमध्ये भाजपची 'चुपचाप कमल छाप' मोहीम फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 21:21 IST2019-05-23T21:20:46+5:302019-05-23T21:21:16+5:30
अनेकदा आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करणे देखील मतदारांच्या जीवावर बेतत होते. त्यावेळी ममता यांनी डाव्यांविरुद्ध 'चूपचाप फूल छाप' अशी मोहीम राबविली होती. त्यानंतर मतदारांनी चुपचाप पद्धतीने ममता यांना मतदान केले होते.

पश्चिम बंगालमध्ये भाजपची 'चुपचाप कमल छाप' मोहीम फत्ते
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजयाची नोंद केली. एकट्या भाजपनेच बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून जनतेने जाती-पातीच्या राजकारणाला आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्दाला फाटा दिल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भाजपने प्रादेशिक पक्षांची देखील धुळाधान केली. तर अनेक राज्यात अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने १८ जागांवर आघाडी मिळवली असून पश्चिम बंगालमध्ये भाजपने राबविलेल्या 'चूपचाप कमल छाप' मोहिमेची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.
काही वर्षांपूर्वी पश्चिम ममता बॅनर्जी यांनी राज्यातून डाव्यांची सत्ता उलथवून टाकत तृणमूल काँग्रेसचा झेंडा फडकविला होता. त्यावेळी डाव्यांना सत्तेतून बाहेर करणे तेवढं सोप नव्हतं. त्यातच पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच नेहमीच हिंसाचार होत असे. अनेकदा आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करणे देखील मतदारांच्या जीवावर बेतत होते. त्यावेळी ममता यांनी डाव्यांविरुद्ध 'चूपचाप फूल छाप' अशी मोहीम राबविली होती. त्यानंतर मतदारांनी चुपचाप पद्धतीने ममता यांना मतदान केले होते.
भारतीय जनता पक्षाने हीच नाडी पकडत, 'चूपचाप फूल छाप'च्या ऐवजी 'चूपचाप कमल छाप' मोहिम राबविली. त्यामुळे मतदारांनी चुपचाप पद्धतीने कमळाला मतदान केले. ही मोहीम यशस्वी ठरल्याचे आज जाहीर झालेल्या निकालातून स्पष्ट झाले. त्यामुळे ममता यांचे शस्त्र त्यांच्यावरच उलटल्याची चर्चा सध्या रंगत आहे.