Lok Sabha Election 2019 Pradnya Thakur's removal BJP should follow Rajdharma: Satyarthi | प्रज्ञा ठाकूरची हकालपट्टी करून भाजपने राजधर्म पाळावा : सत्यार्थी
प्रज्ञा ठाकूरची हकालपट्टी करून भाजपने राजधर्म पाळावा : सत्यार्थी

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान अद्याप राहिले असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबली नसल्याचे चित्र आहे. भाजपची भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. यावेळी प्रज्ञा ठाकूरने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हटले. यावर नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

भारतीय जनता पक्षाने छोटासा राजकीय फायदा न पाहता राजधर्म पाळावा असं आवाहन सत्यार्थी यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरिराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. गांधीजी सत्ता आणि राजकारणाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाने छोटासा फायदा सोडून प्रज्ञा ठाकूरची पक्षातून हकालपट्टी करत राजधर्माचे पालन करावे, असे सत्यार्थी यांनी म्हटले आहे.

प्रज्ञा ठाकूर हिने महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटले होते. या वक्तव्यानंतर प्रज्ञा ठाकूरवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. त्यानंतर प्रज्ञा ठाकूरने ट्विटरवरून माफी मागितली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. महात्मा गांधी आणि गोडसे संदर्भात केलेले वक्तव्य घृणास्पद असल्याचे मोदींनी म्हटले होते. मात्र सत्यार्थी यांची मागणी मान्य करून मोदी राजधर्म पाळणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

 


Web Title: Lok Sabha Election 2019 Pradnya Thakur's removal BJP should follow Rajdharma: Satyarthi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.