काँग्रेस-'आप'ला एकत्र आणण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 16:11 IST2019-03-19T15:44:24+5:302019-03-19T16:11:40+5:30
भाजपविरुद्धच्या आक्रमक लढ्याला धार देण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत.

काँग्रेस-'आप'ला एकत्र आणण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल
नवी दिल्ली - काँग्रेस आणि आम आदमी पक्षात राजधानी दिल्लीत युती होणार की नाही, याचा प्रश्न दररोज पुढे ढकलला जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपविरुद्धच्या आक्रमक लढ्याला धार देण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांनी देखील तीन राज्याच्या कार्यकारी अध्यक्षांसमवेत बैठक बोलविली आहे. या बैठकीला देवेंद्र यादव, हारुण युसूफ आणि राजेश लिलोठिया सामील उपस्थित राहणार आहेत.
या महत्त्वाच्या बैठकीत आम आदमी पक्षासोबत आघाडीसाठी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. 'आप'चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी उत्सुक दिसले होते. तर दिल्ली काँग्रेसमध्ये युती करण्यावरून दोन मतप्रवाह दिसत आहेत. शीला दीक्षित यांच्यामते 'आप'सोबत आघाडी केल्यास काँग्रेसला नुकसान होईल. त्यानंतर दिल्ली काँग्रेसच्या प्रभारी पीसी चाको यांना आपसोबत आघाडी करणे गरजेचे वाटते.
अद्याप उभय पक्षांना एकत्र आणण्यात शरद पवार यांना यश आले का, हे सांगता येणार नाही, परंतु पुढील ४८ तासांत यासंदर्भात घोषणा होऊ शकते.