किळसवाणं! जेवणात पाल सापडली, कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांसमोरच खाल्ली; म्हणाला "अरे, ही तर शिमला मिरची"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:59 IST2026-03-24T11:58:38+5:302026-03-24T11:59:54+5:30
विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील अन्नात पाल सापडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

फोटो - nbt
मध्य प्रदेशातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक असलेलं राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठ (RGPV) कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतं. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील अन्नात पाल सापडल्याचा गंभीर आरोप केला आहे.
विद्यार्थ्यांनी जेव्हा कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला हे दाखवलं, तेव्हा त्याने ती पाल नसून 'शिमला मिरची' असल्याचं सांगितलं आणि पुरावा म्हणून तो तुकडा स्वतः खाऊन टाकला. असं असूनही पालीचा काही भाग शिल्लक राहिल्याचं सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला असून तो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही घटना समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. व्हिडीओ पाहिल्यावर तो तुकडा पालीचाच असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
जेव्हा विद्यार्थ्यांनी या प्रकरणाची तक्रार कॅन्टीन कर्मचाऱ्याकडे केली आणि आमटीमध्ये पाल असल्याचं सांगितलं, तेव्हा कर्मचाऱ्याने ती संशयास्पद वस्तू उचलली आणि तोंडात टाकून खाऊन टाकली. "अरे, ही तर शिमला मिरची आहे" असा दावा त्याने केला. मात्र, त्याचा काही भाग खाली पडला किंवा शिल्लक राहिला.
एका विद्यार्थ्याने सांगितलं की, "आम्ही खूप घाबरलो होतो. स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी कोणी अशी गोष्ट (पाल) कशी काय खाऊ शकतं? सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून, इंटरनेट युजर्स यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण त्या कर्मचाऱ्याच्या कृत्याची खिल्ली उडवत आहेत.