The list of prosperous cities is Bengaluru, Delhi, Mumbai; The location of the three is just behind | समृद्ध शहरांच्या यादीत बंगळुरू, दिल्ली, मुंबईला स्थान; पण...
समृद्ध शहरांच्या यादीत बंगळुरू, दिल्ली, मुंबईला स्थान; पण...

लंडन : जगातील ११३ देशांचा समावेश असलेल्या जागतिक समृद्ध निर्देशांकात भारताची सायबर सिटी बंगळुरूने ८३ वे स्थान पटकावले आहे. समृद्ध शहरांच्या यादीत बंगळुरूबरोबर दिल्लीमुंबई यांनाही स्थान मिळाले असले, तरी तिन्ही शहरे अतिशय मागेच आहेत.
स्वित्झर्लंडचे झुरिक शहर या निर्देशांकात पहिल्या स्थानी आहे. यंदा पहिल्यांदाच जारी करण्यात आलेल्या निर्देशांकासाठी आर्थिक आणि सामाजिक समावेशकता हे निकष लावण्यात आले आहेत.

या निर्देशांकात भारताची राजकीय राजधानी दिल्ली १०१व्या, तर आर्थिक राजधानी मुंबई १०७वे क्रमांकावर आहे. ‘प्रॉस्पेरिटी अँड इन्क्ल्युशन सिटी सील अँड अवॉर्डस् (पिकसा) इंडेक्स’ या नावाचा हा निर्देशांक उत्तर स्पेनमधील बिलबाव शहरात समारंभपूर्वक जारी करण्यात आला. शहराची आर्थिक वृद्धी आणि वृद्धीची लोकसंख्यात्मक समावेशकता हे प्रमुख निकष त्यासाठी लावण्यात आले आहेत. सर्वोच्च २० शहरांना ‘पिकसा सील’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बिलबाव शहराला निर्देशांकात २०वे स्थान मिळाले आहे.
स्पेनमधील बिस्के शहराच्या विभागीय परिषदेचे ‘रणनीतिक कार्यक्रम’ संचालक एसिअर अ‍ॅलिया कास्टनोस यांनी नव्या निर्देशांकाबाबत माहिती देताना सांगितले की, पिकसा हा जगातील पहिला बिगर-व्यावसायिक मानांकन निर्देशांक आहे. जीडीपीच्या पलीकडे जाऊन आर्थिक उत्पादकतेचे मोजमाप तो करतो. अर्थव्यवस्थेत लोक किती चांगले जीवन जगत आहेत, कोणत्या लोकांना अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी व तिचे लाभ मिळण्यासाठी अधिक सबल केले जात आहे, याचे चित्र हा निर्देशांक जगासमोर सादर करतो. (वृत्तसंसंस्था)

काय होते निकष?
कास्टनोस यांनी सांगितले की, यशाचे मोजमाप आता नव्या निकषांवर करणे आवश्यक असल्याच्या मुद्द्याला सरकारी आणि खासगी क्षेत्रातही मान्यता मिळत आहे. अर्थव्यवस्थेतील उत्कर्ष वा समृद्धीचे मोजमाप करताना पारंपरिक रोजगार, कौशल्य आणि उत्पन्न या निकषाबरोबरच आरोग्य, घरांचा किफायतशीरपणा आणि जगण्याची गुणवत्ता हे निकषही लावले पाहिजेत, असे आता सर्वांनाच वाटू लागले आहे. नवा निर्देशांक नेमके हेच निकष लावून उत्कर्षाचे मोजमाप करत आहे.

Web Title: The list of prosperous cities is Bengaluru, Delhi, Mumbai; The location of the three is just behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.