कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:16 IST2025-07-26T12:15:32+5:302025-07-26T12:16:23+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुलगा फक्त लिक्विड डाएट घेत होता आणि त्यासोबतच त्याने अलीकडेच वर्कआऊट करायला सुरुवात केली होती.

फोटो - tv9hindi
तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलाचा त्याच्या घरामध्येच संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला श्वास घ्यायला त्रास झाला. सोशल मीडियावर दाखवल्या जाणारा ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलगा फक्त लिक्विड डाएट घेत होता आणि त्यासोबतच त्याने अलीकडेच वर्कआऊट करायला सुरुवात केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलेचेलमध्ये ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या शक्तिश्वरणचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की, शक्तिश्वरण पूर्णपणे निरोगी आणि एक्टिव्ह मुलगा होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्याने यूट्यूबवर डाएट प्लॅनचा व्हिडीओ पाहिला आणि तोच ट्रेंड फॉलो केला. ऑनलाईन सांगण्यात आलेल्या डाएट प्लॅन फॉलो करत होता.
लिक्विड डाएट ठरलं जीवघेणं
शक्तिश्वरणने हा ट्रेंड फॉलो करायला सुरुवात केली तेव्हा त्याने कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतला नव्हता. तो लिक्विड डाएटवर होता. कदाचित हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी त्याने काही औषधं घेण्यास सुरुवात केली होती आणि अलीकडेच त्याने वर्कआऊट सुरू केला होता. गेल्या काही दिवसांपासून शक्तिश्वरण जेवण पूर्णपणे टाळत होता. जेणेकरून तो ऑनलाईन व्हिडिओमध्ये सांगितलेले डाएट रुल्स फॉलो करू शकेल.
कॉलेजला जाण्याआधी कमी करायचं होतं वजन
गुरुवारी शक्तिश्वरणने कुटुंबाला सांगितलं की, अचानक त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे. कुटुंबाला काही समजण्यापूर्वीच तो बेशुद्ध पडला. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शक्तिश्वरण त्याच्या वजनाबद्दल खूप काळजीत होता आणि अलीकडेच त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता, जिथे जाण्यापूर्वी त्याला त्याचं वजन कमी करायचं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून तो तरुण फक्त फळं खात होता आणि ज्यूस पित होता आणि त्यामुळे त्याचं वजनही बरंच कमी झालं होतं.