कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 08:59 IST2025-12-20T08:59:03+5:302025-12-20T08:59:33+5:30
रोज जीवन मृत्यूशी झुंजणाऱ्या एका युवकाची ही कहाणी आहे. त्याचं नाव आहे हरीश, सहा बाय चारचा बेड हेच त्याचे संपूर्ण आयुष्य बनलं आहे. इतकेच आयुष्य असताना मागील १२ वर्षापासून तो तेदेखील उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही.

कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
नवी दिल्ली - मृत्यूची वाट पाहत जगणं ही वेदनादायी आयुष्य आहे की शांतपणे मृत्यूला कवटाळणे, जगातील कुठल्याही कोर्टाला हा निर्णय देणे कठीण आहे. परंतु परिस्थिती बिकट असेल तर निर्णय टाळणे आणखी आव्हानात्मक होते. देशातील सर्वात मोठे न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टात १३ जानेवारी दुपारी ३ वाजता एक निर्णय घेणार आहे. हा निर्णय मृत्यूची वाट पाहत वेदनेने आयुष्य जगणाऱ्या एका युवकाला शांतपणे मृत्यू दिला जावा की नाही हा असेल.
हा निर्णय भलेही सुप्रीम कोर्टाचा असेल परंतु येत्या १३ जानेवारीला या युवकाच्या आई वडिलांना अखेरचं बोलावून त्यांचे मत जाणून घेण्यासाठी कोर्टात बोलावले आहे. एका आईची इच्छा आहे की तिच्या मुलाला शांतपणे मृत्यू यावा. मुलाच्या वेदना सहन होत नसल्याने तिने मन कठोर केले आणि देवाकडे त्याची यातून सुटका करावी अशी प्रार्थना करते. परंतु आजपर्यंत तिच्या मुलाची वेदनेतून सुटका झाली नाही. त्यामुळे तिने निराश होत कोर्टाकडे हात पसरले आहेत.
१२ वर्षापासून 'तो' निःशब्द
रोज जीवन मृत्यूशी झुंजणाऱ्या एका युवकाची ही कहाणी आहे. त्याचं नाव आहे हरीश, सहा बाय चारचा बेड हेच त्याचे संपूर्ण आयुष्य बनलं आहे. इतकेच आयुष्य असताना मागील १२ वर्षापासून तो तेदेखील उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. कारण ना तो उठू शकतो, ना चालू शकतो. ना शरीराची हालचाल करू शकतो. त्याला हसायला येत नाही, ना रडायला येते. वेदनेने व्याकुळ असलेल्या या युवकाला त्याचे दु:ख कुणाला सांगताही येत नाही. सहज शब्दात सांगायचे तर तो एक जिवंत मृतदेह बनून राहिला आहे. एक असा मृतदेह त्याचे हृदय धडधड करतंय पण तो जीवन जगू शकत नाही.
कुटुंबाची व्यथा
दिल्लीपासून नजीक गाझियाबाद येथे एका घरातील ही घटना आहे. ३ खोल्यांच्या या घरात ४ जण राहतात. वडील अशोक राणा, आई निर्मला देवी आणि छोटा मुलगा आशिष...मात्र घरातील एका खोलीत बेडवर स्तब्ध पडलेला एक युवक ज्याचे नाव हरिश आहे. वय ३३ वर्ष, हरिशला या अवस्थेत पाहून कुणाचेही मन व्याकुळ होईल. त्या वेदनेचा अंदाज येईल. हरिशसोबत त्याचे कुटुंब १२ वर्षापासून इथेच राहत आहे. कायद्याने आपण अशा जगात राहतो, तिथे मृतदेहासोबत राहण्यासाठी परवानगी नाही. परंतु जीवन आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या जिवंत मृतदेहासोबत राहणे किती वेदनादायी असू शकते हे या कुटुंबालाच माहिती आहे.
काय घडलं होतं?
१२ वर्षापूर्वीची घटना, हरिश आणि त्याचे कुटुंब हसत खेळत आयुष्य जगत होते. हरिशला इंजिनिअर बनायचे होते. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१३ साली त्याने चंदीगड यूनिवर्सिटीत प्रवेश घेतला. इंजिनिअरचं शिक्षण सुरू झाले. तो कॉलेजजवळ एका परिसरात पीजी म्हणून राहत होता. त्याची खोली चौथ्या मजल्यावर होती. कॉलेजमधून आल्यानंतर एकेदिवशी हरिश त्याच्या बालकनीत उभा होता. त्याचवेळी तो तिथून खाली पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा श्वास सुरू होता परंतु बेशुद्ध अवस्थेत पडून राहिला. हरिशच्या घरच्यांनी हा अपघात नसून कुणीतरी घातपात केला असा संशय व्यक्त केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला परंतु हाती काहीच लागले नाही. हरिशची तब्येत सुधारत नव्हती. दिल्लीतील एम्स, राम मनोहर लोहिया, त्यानंतर जयप्रकाश नारायण आणि त्यानंतर फोर्टिस हॉस्पिटलला घरच्यांनी त्याला उपचारासाठी नेले परंतु काहीच सुधारणा झाली नाही. अनेक वर्ष सरत गेली परंतु हरिशची अवस्था जैसे थे...मागील १२ वर्षात हरिश जिवंत मृतदेह बनून बेडवर खिळून पडला आहे.
मुलासाठी आईनं मागितला मृत्यू
मुलाची अवस्था आई वडिलांना पाहवत नव्हती. कित्येक वर्ष झाली तरी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही हे पाहून आई वडिलांना नैराश्य आले. त्यामुळे हरिशच्या कुटुंबाने दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. हरिशला इच्छामृत्यू द्या अशी मागणी त्यांनी केली. कोर्टाने डॉक्टर अथवा डॉक्टरांच्या समितीचा रिपोर्ट घ्यावा आणि त्यानंतर निर्णय द्यावा असंही कुटुंबाने म्हटलं. मात्र आपल्या कायद्यात कुणालाही इच्छामृत्यूची परवानगी नाही. संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे मात्र मृत्यूचा अधिकार कुणालाही नाही. हायकोर्टाने आई वडिलांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर आई वडिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
याआधीही २ वेळा कुटुंब सुप्रीम कोर्टात गेले
२०१८ मध्ये आणि पुन्हा २०२३ मध्ये हरीशच्या पालकांनी डॉक्टर आणि मेडिकल बोर्डाचा सल्ला घेतल्यानंतर त्यांच्या मुलाला या वेदनादायक जीवनातून मुक्त करण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही वेळा पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हरीशच्या खटल्याची सुनावणी केली. पहिल्यावेळी भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ आणि नंतर भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली मात्र दोन्ही वेळा सुप्रीम कोर्टाने हरीशला इच्छामरण देण्यास नकार दिला.
आता तिसऱ्यांदा कोर्टात अर्ज, हरीशचा मेडिकल रिपोर्ट पाहिला
हरीशच्या पालकांनी तिसऱ्यांदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावेळी कोर्टाने एम्सकडून सविस्तर वैद्यकीय अहवाल मागितला. वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. हरीशच्या वैद्यकीय अहवालाची समीक्षा केल्यानंतर न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन म्हणाले की, हा एक अतिशय दुःखद रिपोर्ट आहे आणि या टप्प्यावर ते मुलाला या स्थितीत सोडून देऊ शकत नाहीत.
असा होईल निर्णय
हरीशची प्रकृती सुधारण्याची किंवा तो कोमातून परत येण्याची कोणतीही आशा नाही असं एम्सच्या वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने १३ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अंतिम निर्णय घेण्यापूर्वी हरीशच्या पालकांशी शेवटचा बोलण्याचा निर्णय घेतला. कोर्टाला हरीशच्या पालकांकडून स्वतः ऐकायचे आहे की हरीशला या वेदनादायक जीवनातून मुक्त करावे की मृत्यूची वाट पाहण्यासाठी सोडावे. जर पालकांशी बोलल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हरीशला मृत्यू देण्याचा निर्णय घेतला तर हरीश ज्यावर लाइफ सपोर्ट सिस्टमवर मृतदेहासारखा पडून आहे ती सपोर्ट सिस्टम काढून टाकली जाईल.