नराधमाला आजन्म कारावास, महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणी कोलकाता न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 07:52 IST2025-01-21T07:52:22+5:302025-01-21T07:52:50+5:30
Kolkata Rape Case: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरविलेल्या संजय रॉय याला आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी सुनावली.

नराधमाला आजन्म कारावास, महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणी कोलकाता न्यायालयाचा निर्णय
कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरविलेल्या संजय रॉय याला आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सोमवारी सुनावली. सीलदह येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी निकालपत्रात म्हटले आहे की, संजय रॉय याने केलेला गुन्हा दुर्मीळ श्रेणीतला नसून, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावली नाही.
गेल्या वर्षी ९ ऑगस्टला महिला डाॅक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. डॉक्टरांनी अनेक महिने आंदोलन केले होते. याप्रकरणी संजय रॉयला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास त्याला आणखी पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या निकालाविरोधात रॉयला कोलकाता उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे. आवश्यकता भासल्यास त्याला कायदेशीर साहाय्यही दिले जाईल, असे न्या. दास यांनी म्हटले आहे.
महिलेच्या पालकांना १७ लाखांची भरपाई
महिला डॉक्टरवर कामावर होती. तिच्या जीवितरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची होती. तिच्या मृत्यूपायी भरपाई म्हणून १० लाख रुपये, तिच्यावरील लैंगिक अत्याचाराची भरपाई म्हणून ७ लाख, असे १७ लाख रुपये तिच्या पालकांना देण्यात यावेत, असा आदेश न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिला. (वृत्तसंस्था)
माझ्यावरील सर्व आरोप खोटे : संजय रॉय
मी निर्दोष आहे, तरीही मला दोषी ठरविण्यात आले. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, असे संंजय रॉय याने न्यायालयात सांगितले.
महिला डॉक्टरचे पालक निकालावर नाराज
तपास निष्पक्ष पद्धतीने झाला नाही. या घटनेतील इतर गुन्हेगारांना संरक्षण दिले गेले. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे पीडितेच्या पालकांनी म्हटले आहे.ही त्यांनी सांगितले.
...तर त्याला फाशी झाली असती : ममता
कोलकाता : महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला आजन्म कारावासाची शिक्षा कोलकाता न्यायालयाने सुनावली. या निकालाबद्दल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिसांनी केला असता, तर दोषीला फाशीची शिक्षा झाली असती, असे त्या म्हणाल्या.