"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 06:41 IST2023-05-31T06:40:29+5:302023-05-31T06:41:01+5:30
गरीबांचे जीवन उंचावल्याचा दावा

"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना
नवी दिल्ली : ‘आपल्या प्रत्येक निर्णयामागे लोकांचे जीवन सुधारण्याची इच्छा हेच एक कारण आहे. आज आम्ही देशाच्या सेवेला नऊ वर्षे पूर्ण करीत आहोत. मी कृतज्ञ आणि आभारी आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू,’ अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील त्यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व्यक्त केली.
सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांशी संबंधित आकडेवारी मांडताना मोदींनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले की, “गेल्या ९ वर्षांत आम्ही भारतातील सर्वांत गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला. अनेक उपक्रमांद्वारे आम्ही लाखो लोकांचे जीवन बदलले. प्रत्येक नागरिकाच्या उन्नतीसाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आमचे ध्येय निरंतर आहे.”
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेला लेख शेअर केला.
सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे नियोजन केले आहे. पंतप्रधान मोदी बुधवारी राजस्थानमधील अजमेर येथे सभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देशभरात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. देशातील प्रत्येक राज्यात आयोजित पत्रकार परिषदांमध्ये सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला.
‘शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळणार’
‘मोदी सरकारने नऊ वर्षांच्या कार्यकाळात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोदी यांनी त्यांच्या धोरणांमध्ये ‘अंत्योदय’ आणि सेवेचा संकल्प सर्वोपरी ठेवला आहे आणि त्यांचे सरकार हे सुनिश्चित करत आहे की कल्याणकारी योजनांचा लाभ रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. ,