अश्लील संदेश पाठवणा-याला राष्ट्रपतींच्या मुलीने शिकवला धडा
By Admin | Updated: August 13, 2016 18:23 IST2016-08-13T15:56:04+5:302016-08-13T18:23:28+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची फेसबूकवर मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी अश्लील संदेश पाठवणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे

अश्लील संदेश पाठवणा-याला राष्ट्रपतींच्या मुलीने शिकवला धडा
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 13 - फेसबूकवर मुलींना अश्लील संदेश पाठवणा-या आंबटशौकिनांची कमी नाही. अनेकदा असे संदेश पाठवणा-यांना मुली ब्लॉक करुन दुर्लक्ष करतात. पण त्यामुळे असे संदेश पाठवणे बंद होत नाही, त्या मुलीने ब्लॉक केलं म्हणून मग मोर्चा दुस-या मुलीकडे वळतो. नेमकं हेच होऊ नये यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी अश्लील संदेश पाठवणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे.
पार्थ मंडल नावाची व्यक्ती शर्मिष्ठा मुखर्जी यांना अश्लील मेसेज पाठवत होता. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यानंतर त्याला ब्लॉकदेखील केलं. पण त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी पार्थ मंडलच्या फेसबूक प्रोफाईलचे आणि पाठवलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट काढून आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केले. तसंच इतरांनी या व्यक्तीपासून सावध राहावे असं आवाहनही केलं आहे.
'पार्थ मंडल नावाची व्यक्ती मला अश्लील संदेश पाठवत होती. सुरुवातीला मी दुर्लक्ष करण्याचा विचार केला, पण नंतर मी विचार केला की जर मी गप्प राहिले तर तो दुसऱ्या लोकांनाही त्रास देईल. त्यामुळे फक्त त्याला ब्लॉक करणेच पुरेसे नाही', असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या फेसबुकवर लिहिलं आहे.
'अशा लोकांची माहिती सार्वजनिकरित्या उघड केली पाहिजे. त्या व्यक्तीच्या प्रोफाईल आणि मेसेजचे फोटो शेअर करत आहे, असंही मुखर्जी यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्या पोस्टला शेअर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं आवाहनही केलं आहे.