राजस्थानच्या विधानसभेमध्ये भूत-आत्म्यांचा वावर, आमदारांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:56 IST2018-02-23T14:54:10+5:302018-02-23T14:56:55+5:30
एखादे पडके घर, निर्मनुष्य ठिकाण, आडवाट येथे भूताप्रेतांचा वावर असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण राजस्थानमध्ये चक्क राज्याच्या विधानसभेलाच भूताने झपाटल्याची चर्चा असून...

राजस्थानच्या विधानसभेमध्ये भूत-आत्म्यांचा वावर, आमदारांमध्ये भीतीचे वातावरण
जयपूर - एखादे पडके घर, निर्मनुष्य ठिकाण, आडवाट येथे भूताप्रेतांचा वावर असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण राजस्थानमध्ये चक्क राज्याच्या विधानसभेलाच भूताने झपाटल्याची चर्चा असून, विधानसभेच्या इमारतीत भूत आत्म्यांचा वावर असल्याची शंका राज्यातील आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या भूतबाधेमुळेच राज्याच्या विधानसभेत दोनशे आमदारांची संख्या फार काळ टिकत नसल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.
राजस्थानच्या विधानसभेची सदस्यसंख्या दोनशे आहे. मात्र सभागृहात पैकीच्या पैकी आमदार फार काळ टिकत नाहीत. कधी कुणी राजीनामा देतो, तर कुणाला तुरुंगवास होतो, कधी कुणाचा अकस्मित मृत्यू होतो. या सर्वासाठी विधानसभेतील प्रेतात्मा कारणीभूत असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. आमदारांनी आपल्या मनातील भीतीबाबत मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच शांतीसाठी पुजाऱ्यांना बोलावून विशेष पूजा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान गुरुवारी राजस्थान विधानसभेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी एक पुजारी पूजा विधी करताना दिसत होता.
राजस्थानमधील भाजपा आमदार कल्याण सिंह चौहान यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर राजस्थानमधील अन्य आमदारांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी मांडलगड येथील भाजपा आमदार कीर्ती कुमारी यांचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला होता. त्याआधी बीएसपीचे आमदार बी.एल. कुशवाहा यांना हत्येच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यापूर्वी गेल्या विधानसभेतील काँग्रेसचे आमदार महिपाल मणेरदा, मलखान सिंह बिश्नोई आणि बाबू लाल नागर यांना हत्येच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला होता.
राजस्थानच्या विधानसभेचे बांधकाम ज्या ठिकाणी करण्यात आले त्यातील काही भाग स्मशानाच्या जमिनीत झाले होते. विधानसभेच्या इमारतीपासून 200 मीटर अंतरावर लालकोठी मोक्षधाम नावाचे स्मशान आहे. राजस्थानच्या विधानसभेची इमारत एकूण 17 एकर परिसरात पसरलेली असून, 1994 ते 2001 या काळात या विधानसभेच्या इमारतीचे बांधकाम झाले होते.