डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:10 IST2025-12-14T11:10:10+5:302025-12-14T11:10:48+5:30
Thiruvananthapuram Corporation Election Results: केरळच्या राजकारणात एक मोठे आणि महत्त्वाचे वळण येण्याची शक्यता आहे. केरळ कॅडरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी राहिलेल्या आर. श्रीलेखा या तिरुवनंतपुरमच्या महापौर बनू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश
केरळच्या राजकारणात सध्या भूकंपासारखी मोठी घटना घडली आहे. तिरुवनंतपुरम महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत, डाव्या लोकशाही आघाडीचा मजबूत बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. या निवडणुकीत भाजपने १२३ जागांपैकी तब्बल ५० वॉर्डांमध्ये एकहाती विजय मिळवला आहे. यामुळे केरळच्या राजकारणात एक मोठे आणि महत्त्वाचे वळण येण्याची शक्यता आहे. केरळ कॅडरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी राहिलेल्या आर. श्रीलेखा या तिरुवनंतपुरमच्या महापौर बनू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तिरुवनंतपुरम शहरात डाव्या पक्षाचा मजबूत बालेकिल्ला असून, येथे भाजप एका मोठ्या राजकीय खेळीच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.
आर. श्रीलेखा या २०२० मध्ये आयपीएस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भाजपने पक्षाशी जोडले. त्यांनी आपल्या २६ वर्षांच्या पोलीस सेवेत भ्रष्टाचार आणि महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये केलेल्या कठोर कारवाईमुळे त्यांची प्रतिमा 'स्वच्छ' आणि 'निडर' अधिकारी म्हणून आहे. या मजबूत प्रतिमेचा वापर करून डाव्या पक्षाच्या या मजबूत किल्ल्यात शिरकाव करण्याची भाजपची रणनीती आहे.
भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी श्रीलेखा यांना थेट तिरुवनंतपुरमच्या महापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू केली आहे. एका बाजूला डाव्या पक्षाच्या मजबूत स्थानाला आव्हान देणे आणि दुसरीकडे राज्यातील प्रभावशाली नायर समुदायाचा विश्वास संपादन करणे हा यामागचा उद्देश आहे. स्थानिक राजकारणामध्ये काही गट त्यांना 'श्रीमती गांधी' म्हणूनही संबोधत आहेत, ज्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव वाढत आहे.
जर भाजपने हा निर्णय घेतला आणि श्रीलेखा महापौरपदी विराजमान झाल्या, तर केरळमधील राजकारणावर, विशेषतः तिरुवनंतपुरम शहराच्या विकासावर आणि डाव्या पक्षाच्या वर्चस्वावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
एकूण १०१ वॉर्डांपैकी भाजपने एकट्याने ५० जागा जिंकल्या, ज्यामुळे ते सर्वात मोठा पक्ष ठरले आहेत. तुलनेने, सत्ताधारी एलडीएफला २९ वॉर्ड्स तर काँग्रेस-नेतृत्वाखालील यूडीएफला केवळ १९ वॉर्ड्सवर समाधान मानावे लागले. उर्वरित दोन वॉर्ड्सवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला.