"इस्रायलला शस्त्रास्त्रं पुरवणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करा", या पक्षांनी मोदी सरकारकडे केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 20:55 IST2024-08-01T20:54:36+5:302024-08-01T20:55:22+5:30
Israeli-Palestinian Conflict : या पक्षांनी इस्रायलवर लष्करी निर्बंध लादण्याची आणि शस्त्रे आणि लष्करी उपकरणांची आयात आणि निर्यात थांबविण्यासह सर्व प्रकारच्या लष्करी सहकार्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

"इस्रायलला शस्त्रास्त्रं पुरवणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करा", या पक्षांनी मोदी सरकारकडे केली मोठी मागणी
Israeli-Palestinian Conflict : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. यादरम्यान, पॅलेस्टाईनशी एकता व्यक्त करण्यासाठी भारतातील पाच डाव्या पक्षांनी बुधवारी केंद्र सरकारनं विविध कंपन्यांना इस्त्रायलला शस्त्रास्त्रं पुरवण्यासाठी दिलेले सर्व परवाने आणि परवानग्या रद्द करण्याची मागणी केली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी)-लिबरेशन (भाकपा-माले) या डाव्या पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करत तात्काळ युद्धविराम आणि १९४७ च्या पूर्वीच्या सीमा आणि पूर्व जेरुसलेमला राजधानी म्हणून मान्यता देण्याची आणि इस्रायलवर निर्बंधांची मागणी केली आहे.
डाव्या पक्षांनी सांगितले की, गाझामधील इस्रायलच्या नरसंहाराविरुद्ध संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयांचे उल्लंखन आणि पॅलेस्टाईनमधील लोकांविरुद्ध अशा नरसंहारात झालेली वाढ लक्षात घेऊन भारतातील डावे पक्ष माकपा, भाकपा, आरएसपी, एआयएफबी आणि भाकपा-मालेने भारतीय लोकांना पॅलेस्टाईनच्या लोकांसोबत आपली एकता व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.
या पक्षांनी अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलकडून होत असलेल्या नरसंहार आणि अत्याचाराविरुद्ध एकता व्यक्त करण्याचे आवाहन केले. तसेच, या पक्षांनी इस्रायलवर लष्करी निर्बंध लादण्याची आणि शस्त्रे आणि लष्करी उपकरणांची आयात आणि निर्यात थांबविण्यासह सर्व प्रकारच्या लष्करी सहकार्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करून १२०० लोकांची हत्या केली. त्यामुळे इस्रायलकडून सातत्याने गाझावरील हमासच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात येत आहेत. अलीकडे हिजबुल्लाचा कमांडर फउद शुकर आणि हमास प्रमुख इस्माईल हानिया यांच्या हत्येनंतर इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढला आहे. यासाठी इस्रायलला जबाबदार धरले जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी इस्रायलला हानियाच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी दिली आहे.