सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! प्रीमियम ट्रेनमधून करता येणार प्रवास, केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 20:05 IST2025-01-15T20:05:33+5:302025-01-15T20:05:55+5:30
Leave Travel Concession Rules: केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! प्रीमियम ट्रेनमधून करता येणार प्रवास, केंद्र सरकारचा निर्णय
Leave Travel Concession Rules: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत (LTC) अंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफर ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला (DOPT) विविध कार्यालये/व्यक्तींकडून LTC अंतर्गत विविध प्रीमियम ट्रेन्समध्ये प्रवासाची परवानगी मिळण्याबाबत अनेक सूचना मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रीमियम ट्रेननेही प्रवास करता येणार
DoPT मंगळवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या विभागाने खर्च विभागाशी सल्लामसलत करुन या प्रकरणाचा विचार केला आणि असा निर्णय घेण्यात आला की, सध्याच्या राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांव्यतिरिक्त, आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार LTC अंतर्गत तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि हमसफर एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असेल.
LTC म्हणजे काय?
भारत सरकारचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासादरम्यान काही आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारची LTC योजना (लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन) तयार करण्यात आली आहे. ही योजना कर्मचाऱ्यांना भारतात प्रवास करण्याची आणि प्रवास खर्चाचा लाभ घेण्याची संधी देते. या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि देशाच्या विविध भागात प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. LTC चा लाभ घेणाऱ्या पात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजेव्यतिरिक्त, इतर प्रवासासाठी तिकीटावर झालेला खर्च परत मिळतो.