प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासाठी कायदा; तेजस्वी यादव यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:45 IST2025-10-26T09:45:13+5:302025-10-26T09:45:13+5:30
सत्ता स्थापनेनंतर २० दिवसांत कायदा

प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी देण्यासाठी कायदा; तेजस्वी यादव यांचे आश्वासन
विभाष झा
खगरिया / भोजपूर : बिहारमधील विधानसभा निवडणुकांत विजय मिळवून महागठबंधन सत्तेत आले तर त्यानंतर वीस दिवसांत आम्ही एक महत्त्वाचा कायदा करू. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी मिळेल अशी व्यवस्था त्या कायद्याद्वारे करण्यात येईल, असे आश्वासन या आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी दिले.
खगरिया जिल्ह्यातील परबत्ता आणि अलौली तसेच भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर येथे घेतलेल्या प्रचार सभांमध्ये त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडी सत्तेवर आली तर आम्ही गुंतवणूक आणून आणि कारखाने स्थापन करून बिहारला देशातील आघाडीचे राज्य बनवू त्याचप्रमाणे बेरोजगार पदवीधरांचे दुःख मला पाहवत नाही. त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणू,
भाजपचा ६ जिल्ह्यांत एकही उमदेवार नाही
निवडणुकीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सहा जिल्हे असे आहेत ज्यात भाजपचा एकही उमेदवार नाही. पाच जिल्हे असे आहेत ज्यात भाजपचा फक्त एक उमेदवार आहे. भाजपचे सर्वाधिक उमेदवार पूर्व चंपारण जिल्ह्यांत आहेत.
जाहीरपणे वाटले पैसे, पप्पू यादव यांना नोटीस
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना जाहीरपणे पैसे वाटणे महागात पडले आहे. आयकर विभागाने यादव यांना नोटीस बजावली असून, हे पैसे आले कुठून, अशी विचारणा या विभागाने केली आहे.
एनडीए ही पाच पांडवांची युती : अमित शाह
पाटणा : यंदाची बिहारमधील ही निवडणूक 'जंगलराज' राज्यात परत येणार की जनता विकासाचा मार्ग निवडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देणार, हे ठरवेल. माझी छठ मैय्यांना एकच प्रार्थना आहे की बिहार कायमस्वरूपी जंगलराजपासून मुक्त राहावे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. खगडिया येथे आयोजित जाहीर सभेत शाह बोलत होते. एनडीए ही पाच पांडवांची युती आहे आणि त्यांच्या राजवटीत गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचा दावा शाह यांनी केला. राज्यात लालू-राबडी सरकार आले तर पुन्हा जंगलराज येईल, असा इशारा त्यांनी या सभांमधून दिला.