‘रोकड’ने न्याय व्यवस्थेत प्रचंड खळबळ; बदली नको, थेट राजीनाम्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:12 IST2025-03-22T11:09:53+5:302025-03-22T11:12:28+5:30
सिंग म्हणाले, “मला वाटते की अशा परिस्थितीत बदली हा उपाय नाही, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे. वरिष्ठ वकील राकेश द्विवेदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशी करून न्यायाधीशांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन सर्व तथ्य शोधून काढावे. न्यायाधीशांची प्रतिष्ठा आहे, ही बाब दाबून ठेवता येणार नाही.

‘रोकड’ने न्याय व्यवस्थेत प्रचंड खळबळ; बदली नको, थेट राजीनाम्याची मागणी
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्यानंतर, कायदेतज्ज्ञांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बदली करण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी हे प्रकरण ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे सांगितले आणि न्यायाधीशांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे. ते म्हणाले की न्यायाधीशाने ‘पूर्णपणे प्रामाणिक’ असणे अपेक्षित आहे आणि हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तो (भ्रष्टाचार) अजिबात खपवून घेतला जाऊ नये.
सिंग म्हणाले, “मला वाटते की अशा परिस्थितीत बदली हा उपाय नाही, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले पाहिजे. वरिष्ठ वकील राकेश द्विवेदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशी करून न्यायाधीशांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन सर्व तथ्य शोधून काढावे. न्यायाधीशांची प्रतिष्ठा आहे, ही बाब दाबून ठेवता येणार नाही.
नेता असता तर लगेच कारवाई झाली असती
न्या. वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याचे प्रकरण शुक्रवारी संसदेत गाजले.
काँग्रेसचे जयराम रमेश यांनी सकाळच्या सत्रात हा मुद्दा उपस्थित करून अलाहाबाद उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालवण्यासंबंधीच्या प्रलंबित नोटिसीचाही उल्लेख केला.
हेच प्रकरण एखादा राजकीय नेता, नोकरशहा किंवा उद्योगपतीशी संबंधित असते तर त्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई झाली असती, असेही रमेश यांनी नमूद केले.
न्यायपालिकेतील भ्रष्टाचार ही गंभीर समस्या : सिब्बल
न्यायपालिकेतील भ्रष्टाचार ही गंभीर समस्या असून, न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची गरज असल्याचे राज्यसभेचे खासदार व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
२०२१ मध्ये नेमणूक
न्या. यशवंत शर्मा यांची २०२१ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती.
‘आम्ही’ काही कचराकुंडी नाही...
घरात प्रचंड रोख रक्कम सापडल्याने वादग्रस्त ठरलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. वर्मा यांची कॉलेजियमने अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली आहे. यावर बार असोसिएशनने प्रचंड नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी सुनावणी टाळली
दिल्ली उच्च न्यायालयात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश असलेले वर्मा यांनी आपल्या घरी प्रचंड स्वरूपात रोख रक्कम सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी कोणत्याही प्रकरणावर सुनावणी केली नाही.
या प्रकरणावर टिप्पणी नको : भाजप
न्या. वर्मा प्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सावध भूमिका घेत न्यायालयांच्या अशा प्रकरणांत पक्षाने टिप्पणी करू नये, असे मत मांडले. सरन्यायाधीशांनी याची दखल घेतली असल्याने यावर मत मांडणे चुकीचे असल्याचे पात्रा म्हणाले.