"Language other than Hindi is not a weakness" | ''हिंदीशिवाय इतर भाषा हा दुबळेपणा नाही''

''हिंदीशिवाय इतर भाषा हा दुबळेपणा नाही''

नवी दिल्ली : हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, असदुद्दीन ओवेसी, कमल हासन आदींनी टीका केली होती. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शहा यांच्यावर निशाणा साधत म्हटले आहे की, भारतात हिंदीव्यतिरिक्त बोलल्या जाणाऱ्या प्रादेशिक भाषा हा दुबळेपणा नाही.
राज्यघटनेतील भाषाविषयक परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या २३ भाषांचा राहुल गांधी यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये उल्लेख केला. या प्रत्येक भाषेच्या नावापुढे तिरंगा राष्ट्रध्वज झळकविला आहे. लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृति इराणी यांनी पराभव केला होता. मात्र त्याच निवडणुकांत केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झाले होते. उत्तर व दक्षिण भारताला जोडण्यासाठी आपण वायनाडमधून निवडणूक लढविली, असे वक्तव्य त्यावेळी राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे अमित शहा यांच्या वक्तव्यांवर राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
>हिंदीविरोधकांचे देशावर प्रेम नाही?
जे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याबाबत विरोध करतात, त्यांचे या देशावर प्रेम नाही हे सिद्ध होते, अशी टीका त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव यांनी केली आहे.
देशातील बहुसंख्य लोक हिंदी भाषा बोलतात. त्यामुळे ती राष्ट्रभाषाच आहे, असेही ते म्हणाले.
हिंदीला समर्थन देणाºया अमित शहा यांच्या विरोधात द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन व त्यांचे पक्ष कार्यकर्ते २० सप्टेंबर रोजी तामिळनाडूत निदर्शने करणार आहेत.
भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कन्नड भाषेची भलामण केली होती. कन्नड संस्कृती जपणे हे आमचे कर्तव्य आहे असे सांगून त्यांनी अमित शहा यांच्या हिंदी प्रेमाला विरोध केला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  "Language other than Hindi is not a weakness"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.