वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 08:48 IST2025-08-27T08:47:24+5:302025-08-27T08:48:30+5:30

Jammu And Kashmir Flash Floods: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

Landslide near Jammu and Kashmir Vaishno Devi: Death toll reaches 30 | वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. मंगळवारी माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर अर्धकुंवारीजवळ झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ३० जणांच्या मृत्युची नोंद करण्यात आली. तर, अनेकजण जखमी झाले, अशी माहिती रियासीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक परमवीर सिंह यांनी बुधवारी सकाळी दिली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली.

परमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत ३० जणांच्या मृत्युची नोंद करण्यात आली. आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीसह बचावकार्य सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.  वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या अधकवारी गुहा मंदिरातील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झाल्याचे सांगण्यात आले.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस आणि ढगफुटीचा इशारा दिला. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू विभागातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. उत्तर रेल्वेने जम्मूकडे जाणाऱ्या २२ गाड्या रद्द केल्या आहेत तर २७ गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

मंगळवारी जम्मू शहरात अवघ्या २४ तासांत २५० मिमीपेक्षा अधिक मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे अनेक घरे आणि शेती क्षेत्रात पाणी शिरले, तर भूस्खलनामुळे रस्ते व पूलांची मोठी हानी झाली आहे. या आपत्तीतून ३५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आणि भारतीय लष्कर या सर्व यंत्रणा बचाव कार्यात सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. संपूर्ण भागात आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Landslide near Jammu and Kashmir Vaishno Devi: Death toll reaches 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.