पाकिस्तानातून घुसखोरी करताना फुटला भूसुरुंग; भारताने केलेल्या गोळीबारात चौघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:57 IST2025-04-02T13:54:27+5:302025-04-02T13:57:13+5:30
पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय लष्करावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

पाकिस्तानातून घुसखोरी करताना फुटला भूसुरुंग; भारताने केलेल्या गोळीबारात चौघे ठार
Pakistan LOC Firing: जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. घुसखोरी सुरु असतानाच पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. पाकिस्तानच्या या कारवाईला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत ४ ते ५ घुसखोर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून करण्यात आलेल्या या कृत्यामुळे सीमेवरील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आणि घुसखोरीचा प्रयत्न केला. मंगळवारी झालेल्या कृत्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झालं. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या या प्रकारामुळे भारतीय लष्कर सतर्क झालं आहे.
मंगळवारी, पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांनी दोन्ही देशांमधील युद्धबंदी कराराचे उल्लंघन करून गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात लष्कराने ४-५ घुसखोरांना ठार मारले. गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन झाल्याचे लष्कराने सांगितले. नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी लष्कराने केलेल्या घुसखोरीमुळे कृष्णा घाटी सेक्टरमध्ये माइनच स्फोट झाला. यानंतर पाकिस्तानी लष्कराने गोळीबार सुरु केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती लष्कराने दिली. मंगळवारी दिवसभर अधूनमधून गोळीबार सुरू होता असेही भारतीय लष्कराने सांगितले. "१ एप्रिल रोजी, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्यामुळे कृष्णा घाटी सेक्टरमध्ये एका माईनचा स्फोट झाला. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला आणि युद्धबंदीचे उल्लंघन केले. आमच्या सैन्याने नियंत्रित आणि संतुलित पद्धतीने प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे," असे लष्कराकडून सांगण्यात आलं.