औरंगाबाद तालुक्यातील जमिनीची एप्रिलपासून होणार पुनर्मोजणी
By Admin | Updated: February 15, 2015 00:56 IST2015-02-14T23:50:27+5:302015-02-15T00:56:53+5:30
औरंगाबाद : भूमी अभिलेख खात्याने राज्यातील संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यासह राज्यातील ठराविक ...

औरंगाबाद तालुक्यातील जमिनीची एप्रिलपासून होणार पुनर्मोजणी
औरंगाबाद : भूमी अभिलेख खात्याने राज्यातील संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यासह राज्यातील ठराविक तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. औरंगाबाद तालुक्यात येत्या १ एप्रिलपासून या मोजणीला सुरुवात होणार असल्याचे भूमी खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले.
राज्यात याआधी ब्रिटिश काळात म्हणजे शंभर वर्षांपूर्वी जमिनीची मोजणी झालेली आहे. त्यानंतर एकदाही संपूर्ण जमिनीची मोजणी झालेली नाही. शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे मूळ धारण जमिनीचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होऊन त्याचे पोटविभाजन झाले आहे. परिणामी प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात ताळमेळ राहिलेला नाही. तसेच जुने बांध, वरळ्या नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या हद्दीचे वाद वाढले असून हे वाद सोडविणे कठीण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपूर्वीच राज्य सरकारने राज्यभर जमिनीच्या पुनर्मोजणीचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. मध्यंतरी या कार्यक्रमासाठी कर्मचार्यांची भरतीही करण्यात आली. आता सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख खात्याने पहिल्या टप्प्यात ठराविक तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्याची तयारी चालविली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व सहा महसूल आयुक्तालयांची ठिकाणे निवडण्यात आली आहे. प्रत्येक आयुक्तालयाच्या ठिकाणच्या तालुक्यामध्ये ही योजना राबविली जाणार आहे. त्यानुसार औरंगाबाद तालुक्यात १ एप्रिलपासून संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीला सुरुवात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जमिनीच्या पुनर्मोजणीचे काम हाय रिजोल्यूशन सॅटेलाईट इमेजरी आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
दुसर्या टप्प्यात इतर तालुके
पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यातील जमिनीची पुनर्मोजणी होणार आहे. त्यानंतर दुसर्या टप्प्यात इतर तालुके घेतले जातील. मात्र, दुसरा टप्पा कधी सुरू होईल हे मात्र अद्याप स्पष्ट नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले.