लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:37 IST2025-12-31T15:30:46+5:302025-12-31T15:37:45+5:30
Tej Pratap Yadav Health Update: हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून उपचार

लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
Tej Pratap Yadav Health Update: राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र आणि जनता दल (जनशक्ती पक्ष) अध्यक्ष तेज प्रताप यादव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटणा येथील कंकरबाग येथील मेडिव्हर्सल हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या विशेष पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले.
रुग्णालयात दोन तास तपासणी
मिळालेल्या वृत्तानुसार, तेज प्रताप यादव यांनी असह्य पोटदुखीची तक्रार केली. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते स्वतःहून रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी लगेच त्यांची तपासणी सुरू केली. त्यांची वैद्यकीय तपासणी आणि अल्ट्रासाऊंड चाचणी केली. सुमारे दोन तास चाललेल्या सखोल वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचे सर्व अहवाल आले. काळजीचे कसलेही कारण नाही असे अहवालात स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, तेजप्रताप यांच्या ओळखीच्या एका रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते एक दिवस आधी मंगळवारी रात्रीही त्याच रुग्णालयात गेले होते.
दरम्यान, उपचारानंतर तेज प्रताप रुग्णालयातून बाहेर आले. वाढत्या थंडीमुळे त्यांनी डोक्यावर जाड मफलर आणि शरीरावर लोकरीची शाल गुंडाळल्याचे दिसले. डॉक्टरांनी त्यांना आवश्यक औषधे दिली आहेत आणि आहारात पथ्ये पाळण्यास आणि थंडीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी थोडक्यात संवाद साधला आणि हसत हसत म्हणाले की, येणारे २०२६ हे वर्ष सर्वांसाठी मंगलमय जावो. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि बिहारमधील सर्व लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.