हैदराबाद : तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात ११ नोव्हेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप असलेल्या एका शेतकऱ्याला हातकडी घालून रुग्णालयात नेण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. गुरुवारी या शेतकऱ्याला हातकडी घालून रुग्णालयात घेऊन गेल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
ही घटना गांभीर्याने घेत मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी हिरया नाईक यांना हातकडी घालून रुग्णालयात का नेण्यात आले, असा सवाल केला. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. तसेच, अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार मुख्यमंत्र्यांनी अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे.
या घटनेबाबत विरोधी पक्ष भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली आहे. आजारी शेतकऱ्याला हातकडी लावून रुग्णालयात नेणे, याला त्यांनी अमानवी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातील लागाचर्ला गावात भूसंपादनाबाबत झालेल्या जनसुनावणीदरम्यान सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी २५ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संगारेड्डी जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या हिरया नाईक यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली, त्यानंतर त्यांना गुरुवारी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. काही स्थानिक टीव्ही चॅनेलवर एक व्हिडिओ वारंवार दाखविला जात होता. ज्यामध्ये हिरया नाईक यांना रुग्णालयात नेत असताना त्यांना हातकडी घातलेली दिसत आहे.
दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून संगारेड्डी जिल्हा पोलीस अधीक्षक संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच, मेडिकल इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर दोन हवालदारांनी शेतकऱ्याला रुग्णालयात नेले. या शेतकऱ्याला हातकडी लावण्याचा निर्णय, त्या दोन हवालदारांनी घेतला होता की कारागृह प्रशासनाने घेतला होता, याचा तपास केला जाईल, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.