कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर सापडला मुहूर्त, बुधवारी होणार शपथविधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:32 IST2018-06-05T15:32:04+5:302018-06-05T15:32:04+5:30
महत्त्वपूर्ण खात्यांवरील रस्सीखेचीमुळे खोळंबलेला कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारास अखेर मुहूर्त सापडला आहे.

कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर सापडला मुहूर्त, बुधवारी होणार शपथविधी
बंगळुरू - महत्त्वपूर्ण खात्यांवरील रस्सीखेचीमुळे खोळंबलेला कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारास अखेर मुहूर्त सापडला आहे. आता बुधवारी जेडीएस आणि काँग्रेसचे मंत्री शपथ घेतील. कुमारस्वामी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जेडीएसच्या नऊ मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती देताना कुमारस्वामींनी सांगितले की," मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या फेरीत जेडीएसच्या आठ ते नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. तसेच जेडीएसच्या वाट्याला येणारी दोन ते तीन मंत्रिपदे रिक्त ठेवली जातील."
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते जी. परमेश्वर यांनीही कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उद्या (बुधवारी) दुपारी एच. डी. कुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
Cabinet expansion will be held at 2 pm tomorrow: #Karnataka Deputy Chief Minister G Parameshwara pic.twitter.com/wpod0mwARc
— ANI (@ANI) June 5, 2018
दुसरीकडे मंत्रिमंडळातील जागा आणि खातेवाटपावरून जेडीएसच्या आमदारांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त कुमारस्वामी यांनी फेटाळून लावले आहे. तसेच पक्षाध्यक्ष एचडी देवेगौडा यांना पुढील फेरीतील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्याचेही कुमारस्वामी यांनी सांगितले.
काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आघाडीबाबत करार झाला असून, या करारानुसार काँग्रेसला मंत्रिमंडळातील 22 मंत्रिपदे आणि जेडीएसकडे 12 मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसकडे गृह, सिंचन, आरोग्य, कृषी आणि महिला व बालकल्याण विभाग, तर जेडीएसकडे वित्त, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पर्यटन आणि परिवहन मंत्रालये असतील.