मणिपूरचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, भाजप आमदाराचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 17:19 IST2023-07-30T17:18:31+5:302023-07-30T17:19:43+5:30
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हाओकीप यांनी मणिपूरच्या जातीय विभाजनाला राजकीय आणि प्रशासकीय मान्यता देण्यास पाठिंबा दिला आहे.

मणिपूरचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, भाजप आमदाराचे मत
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्याचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, असे मत कुकी नेते आणि भाजप आमदार पाउलेनलाल हाओकीप यांनी व्यक्त केले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हाओकीप यांनी मणिपूरच्या जातीय विभाजनाला राजकीय आणि प्रशासकीय मान्यता देण्यास पाठिंबा दिला आहे. कुकी समाजाच्या नेत्यांनी यापूर्वीच कुकी जमातीच्या लोकांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे. भाजप आमदाराच्या या मागणीला एक प्रकारे कुकी नेत्यांच्या वेगळ्या राज्याच्या मागणीलाही पाठिंबा आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि मैतेई संघटनांचे एक समूह COCOMI ने (Coordinating Committee on Manipur Integrity) मणिपूरच्या विभाजनाच्या कोणत्याही मागणीला विरोध केला आहे. राजकीय जाणकारांच्या मते केंद्र सरकारही राज्याच्या विभाजनाच्या समर्थनात नाही. हाओकीप यांच्या सूचनेवर राजकीय समीक्षक म्हणतात की, विभागणी राज्यातील कुकी, मैतेई आणि नागा जमातींसाठी स्वतंत्र प्रदेश तयार करेल, परंतु मिश्र लोकसंख्या असलेल्या ठिकाणी समस्या निर्माण करेल.
दरम्यान, मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार आतापर्यंत सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना विस्थापनाचा सामना करावा लागत आहे. मैतेई समुदाय राज्यातील लोकसंख्येपैकी 53 टक्के आहे आणि बहुतेक लोक इंफाळ खोऱ्यात राहतात. नागा आणि कुकी जमातीचे लोक एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते राज्यातील डोंगराळ भागात राहतात.
चुराचंदपूर जिल्ह्यातील साकोटमधील भाजप आमदार हाओकीप आणि इतर कुकी नेत्यांचे म्हणणे आहे की, बहुसंख्य समुदाय राज्य संसाधनांच्या वाटपावर नियंत्रण ठेवत आहे. आदिवासींच्या जमिनी संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केल्याबद्दलही कुकी नेत्याने नाराजी व्यक्त करत आदिवासींना त्यांचे हक्क दिले जात नसल्याचा आरोप केला.
यावर्षी मणिपूर सरकारने वन कायद्यांतर्गत जंगलांच्या संरक्षणाच्या नावाखाली अनेक कुकी गावांवर बुलडोझर चालविला होता. सीमांकन अहवालावर बंदी घातल्याने कुकी समाजातही नाराजी आहे, असे भाजप आमदार हाओकीप म्हणाले. याचबरोबर, कुकी समाजाने इंग्रजांशीही लढा दिला होता आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत कुकी समाजाचे लोक सामील होते, असेही आमदार हाओकीप यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कुकी नेत्यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या समाजाची लोकसंख्या लक्षात घेता, सीमांकनानंतर त्यांच्या जागांची संख्या वाढू शकते. तर कुकी समुदाय अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असल्याचा आणि म्यानमारमधून अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याचा आरोपही मैतेई समुदायाने केला आहे. मात्र, कुकी समुदायाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.