राजस्थानमधील कोटा येथे एका भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या एका महिलेसह चार मुलांना चिरडलं. या अपघातात महिलेच्या डोक्याला दुखापत झाली, तर चारही मुलं गंभीर जखमी झाली. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात ८ मे रोजी अनंतपूर पोलीस स्टेशन परिसरातील रंगबारी येथील अजय आहुजा नगरमध्ये घडला. ही संपूर्ण घटना समोरील एका घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज १० मे रोजी समोर आलं.
अनंतपूर पोलीस स्टेशनचे एएसआय घमंडी लाल यांनी सांगितलं की, जखमी महिला इंद्राबाई यांचा मुलगा बंटी राठोड, हेमंत राठोड आणि शेजारी मनोज मेहरा यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शुक्रवारी कार चालक चिराग जांगीडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या आरोपी चालक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
जखमी महिलेचा मुलगा बंटी म्हणाला की, मुलं त्यांची सायकल घेऊन उभी असताना आई बाहेर बसली होती. याच दरम्यान, एका भरधाव गाडीने सर्वांना चिरडलं आणि त्यांना १० फूट फरफटतं नेलं. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी बाहेर आले. त्यानंतर त्यांनी गाडीच्या चालकाला पकडून मारहाण केली. पण संधीचा फायदा घेत चालक गाडी घेऊन पळून गेला. या अपघातात इंद्राबाई आणि चारही मुलं जखमी झाली.
अपघातात जखमी झालेला विवान (७), यशिका (११), वैशाली (८) आणि अनिशा (१०) यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलं सायकल चालत होती. पुतण्या आणि भाचीला विज्ञान नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाची यशिकाच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. आज तिच्या हातावर ५ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. इंद्राबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही होणार आहे. विवानच्या हाताला, नाकाला आणि तोंडाला गंभीर जखमा आहेत.