इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 20:34 IST2025-10-22T20:34:07+5:302025-10-22T20:34:56+5:30
Indigo Flight: इंडिगोचे विमान कोलकाताहून श्रीनगरकडे जात होते.

इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
Indigo Flight: कोलकाताहून श्रीनगरकडे निघालेल्या इंडिगो (फ्लाइट क्रमांक 6E-6961) विमानाची बुधवारी (22 ऑक्टोबर 2025) संध्याकाळी वाराणसीच्या लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमान हजारो फूट उंचीवर असताना, विमानात फ्युएल लीक (इंधनगळती) झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाराणसी विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमान हवेत असताना पायलटला इंधनगळतीचा संशय आला. त्यानंतर तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागण्यात आली. एटीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर पायलटने संध्याकाळी सुमारे 4:10 वाजता विमान सुरक्षितपणे रनवेवर उतरवले.
विमानातील 166 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सर्वजण सुरक्षित आहेत. विमान उतरल्यानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून एअरपोर्टच्या एरायव्हल क्षेत्रात हलविण्यात आले. विमानतळ प्रशासनाने सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि विमानतळावरील नियमित उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत.
इंडिगो एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाद्वारे श्रीनगरला पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.” या घटनेनंतर विमानतळावरील तांत्रिक तज्ज्ञांनी विमानाची तपासणी सुरू केली. प्राथमिक तपासणीत फ्युएल सिस्टममध्ये गळती झाल्याचे समोर आले आहे.