कोलकाता पोलिसांनी अडवला भारतीय लष्कराचा ट्रक; बड्या अधिकाऱ्याचा अपघात होता होता वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:55 IST2025-09-03T14:41:17+5:302025-09-03T14:55:08+5:30
पश्चिम बंगालमध्ये भारतीय सैन्याचा अडवल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

कोलकाता पोलिसांनी अडवला भारतीय लष्कराचा ट्रक; बड्या अधिकाऱ्याचा अपघात होता होता वाचला
West Bengal:पश्चिम बंगालच्या कोलकाता पोलिसांनी कोलकाता येथे भारतीय लष्कराचा एक ट्रक अडवल्याने नवा वाद निर्माण झालाय. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि धोकादायक वाहन चालवल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिस आयुक्त मनोज वर्मा लालबाजार येथील पोलिस मुख्यालयात जात असताना ही घटना घडली. बड्या अधिकाऱ्यासोबत हा प्रकार घडल्याने पोलिसांनी कारवाई केल्याचे बोललं जात आहे.
कोलकाता पोलिसांनी मंगळवारी बेजबाबदारपणे गाडी चालवल्याच्या आरोपाखाली लष्कराचा एक ट्रक अडवला होता. त्यानंतर लष्कराचा ट्रक हेअर स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आला. यासोबत ट्रक चालवणाऱ्या जवानाविरुद्ध धोकादायक गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास रायटर्स बिल्डिंगसमोरील बीबीडी बाग नॉर्थ रोडवर घडली. हा सगळा प्रकार घडला त्यावेळी कोलकाता पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांची गाडी लष्कराच्या ट्रकच्या मागे येत होती. सिग्नलवर पोलिस आयुक्तांची गाडी ट्रकला धडकण्यापासून थोडक्यात वाचली.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक कोलकाता येथील फोर्ट विल्यम येथील भारतीय लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालयापासून बीबीडी बागेजवळील बेबॉर्न रोडवरील पासपोर्ट कार्यालयाकडे जात होता. ट्रकमध्ये एक लष्करी जवान आणि एक अधिकारी प्रवास करत होते. या घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले. त्यात लष्कराचा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने रायटर्स बिल्डिंग ट्रॅफिक सिग्नलकडे जाताना दिसून आला. सिग्नलवर ट्रकने अचानक उजवीकडे वळण घेतले.
ट्रकच्या मागे दोन गाड्या येत होत्या, त्यापैकी एक पोलिस आयुक्तांची गाडी होती. अपघात टाळण्यासाठी पोलिस आयुक्तांची गाडी सिग्नलवर उजव्या बाजूने वेगाने पुढे सरकली. यादरम्यान, आयुक्तांची गाडी ट्रकला धडकण्यापासून थोडक्यात बचावली. त्याच वेळी, ट्रकच्या मागे असलेल्या दुसऱ्या कारनेही वेग कमी केला, त्यामुळे कोणताही अपघात झाला नाही. या घटनेनंतर सिग्नलवर तैनात असलेल्या एका वाहतूक पोलिसाने ट्रककडे धाव घेतली. वाहतूक पोलिसाने उजवीकडे वळण्यास वाहनांना मनाई असताना नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल ट्रकला थांबवले.
त्यानंतर ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला. यानंतर फोर्ट विल्यम मुख्यालयातील वरिष्ठ लष्करी अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले. सैन्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप फेटाळून लावला. पोलिसांनी रायटर्स बिल्डिंगजवळ वळण घेत असताना वाहन थांबवले होते. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज जारी केले. हे पूर्णपणे लेन उल्लंघन आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्याचे प्रकरण आहे आणि यामध्ये लष्कर विरुद्ध कोलकाता पोलिस असा कोणताही वाद नाही, असं पोलिसांनी सांगितले.