तिच्या पोटावर वार केले, कोणीच किंकाळ्या ऐकल्या नाहीत?; कोलकाता प्रकरणावर संतापल्या स्मृती इराणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 19:46 IST2024-08-16T19:43:49+5:302024-08-16T19:46:21+5:30
BJP Smriti Irani : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संपूर्ण प्रकरणावर राजकारण करत आहेत, असे स्मृती इराणी यांनी म्हटलं.

तिच्या पोटावर वार केले, कोणीच किंकाळ्या ऐकल्या नाहीत?; कोलकाता प्रकरणावर संतापल्या स्मृती इराणी
Kolkata Rape-Murder Case: पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांसह सामान्य जनताही रस्त्यावर उतरली आहे. पश्चिम बंगालमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरल्या आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला आहे.
कोलकाता बलात्कार प्रकरणासंदर्भात स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तिथे अशी व्यक्ती कोण होती जिच्यामुळे बलात्कारानंतर तो घरी परत येऊ शकतो असा विश्वास बलात्कार करणाऱ्याला होता? मुलीने आत्महत्या केल्याचे पालकांना सांगणाऱ्या पोलिसातील ती व्यक्ती कोण आहे, त्या अधिकाऱ्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली?, असे सवाल स्मृती इराणी यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या संपूर्ण प्रकरणावर राजकारण करत आहेत, असेही स्मृती इराणी यांनी म्हटलं.
"मुख्यमंत्री ममता यांनी 'माझा बलात्कार-माझा बलात्कार'चे राजकारण थांबवावे. राज्यातील राजकारण पाहून भारतातील जनता मुलीवरील बलात्काराविरुद्ध आवाज उठवणार का? राज्याच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्या स्वतःच्या विरोधात आंदोलन करत होत्या? लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणे बंद करा. बलात्कारी बेफिकीर आहेत, पण जमाव येऊन आंदोलकांवर हल्ला करतो. गुंडांची फौज जमते आणि पोलिसांना त्याची माहिती नसते. ते पुराव्याचा भाग असलेल्या गोष्टी नष्ट करतात," असे स्मृती इराणी म्हणाल्या.
"एकच व्यक्ती त्या महिलेवर बलात्कार करत असेल, तिचे पाय तोडत असेल, तिचे हात तोडत असेल, तिचे डोळे काढत असेल, तिच्या छातीवर, पोटावर वार करत असेल आणि ती स्त्री ती ओरडत असेल आणि तिचा आवाज कोणी ऐकला नसेल? हे संपूर्ण कृत्य एकाच बलात्काऱ्याने केले? तो कोण आहे ज्याच्यामुळे बलात्कारानंतर घरी जाऊ शकतो असे बलात्कार करणाऱ्याला वाटलं असेल? एवढा गुन्हा घडूनही हॉस्पिटलच्या त्याच मजल्यावर नूतनीकरण सुरू ठेवणारी व्यक्ती कोण? महिलेच्या पालकांना फोन करून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली?," असे प्रश्नही स्मृती इराणी यावेळी उपस्थित केले.
"यावरून स्पष्टपणे दिसून येते की महिलेवर बलात्कार होत असताना तिचा छळ होत होता. न्यायाच्या शोधात असलेल्या बंगालच्या प्रत्येक नागरिकासोबत संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे. एका मुलीवर तिच्याच रुग्णालयात बलात्कार होतो. असे अनेक प्रश्न आहेत, जनता उत्तरांच्या प्रतीक्षेत आहे. कुटुंबाने पैसे नाही तर न्याय मागितला आहे. कुटुंबाला न्याय मिळवून देणे हीच सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल," असेही स्मृती इराणी म्हणाल्या.