APJ Abdul Kalam Birth Anniversary : एक बुटांचा जोड, 6 शर्ट... एवढीच होती अब्दुल कलामांची संपत्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:35 IST2018-10-15T13:30:11+5:302018-10-15T13:35:10+5:30
भारताचे अकरावे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आजही आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी ओळखले जातात. जर असं म्हटलं की, कलामांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे भारतीयांच्या त्या पिढ्या आहेत ज्यांना त्यांनी स्वप्न पहाण्यासोबतच ती सत्यात उतरवून पुढे जाण्यास शिकवलं, तर वावगं ठरणार नाही.

APJ Abdul Kalam Birth Anniversary : एक बुटांचा जोड, 6 शर्ट... एवढीच होती अब्दुल कलामांची संपत्ती!
भारताचे अकरावे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आजही आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी ओळखले जातात. जर असं म्हटलं की, कलामांची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे भारतीयांच्या त्या पिढ्या आहेत ज्यांना त्यांनी स्वप्न पहाण्यासोबतच ती सत्यात उतरवून पुढे जाण्यास शिकवलं, तर वावगं ठरणार नाही. अनेकदा कलामांच्या संपत्तीवरून चर्चा केल्या जातात. परंतु तुम्हाला माहीत आहे खरंच कलामांकडे किती संपत्ती होती?
आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणाने घालवलेल्या कलामांची संपत्ती काहीच नव्हती. त्यांच्या संपत्तीमध्ये कोणतीही अशी एकही गोष्ट नव्हती ज्यावरून वाद होऊ शकेल. जर त्यांच्या सामानाबाबत बोलायचे झालेच तर फ्रिज, टीव्ही, गाडी आणि एसीही त्यांच्याकडे नव्हता. कलामांकडे त्याच्या संपत्तीच्या रूपामध्ये 2500 पुस्तकं, एक घड्याळ, 6 शर्ट, चार पॅन्ट आणि एक बुटांचा जोड होता.
कलामांना ऐशोआरामात जगणं कधीही मान्य नव्हतं. ते आपल्या पुस्तकांचं वैभव आणि आपल्या पेन्शनच्या आधारावर जीवन जगत होते. त्यांनी स्वतः त्यांच्या जीवनामध्ये चार पुस्तकं लिहिली. कलामांनी आयुष्यात केलेल्या त्यांच्या जमापुंजीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी कोणतीही वैयक्तिक भेटवस्तू स्वतःसोबत घेतली नाही. त्यांनी सर्व भेटवस्तू सरकारी खजिन्यामध्ये जमा केल्या होत्या.
कलामांचे मीडिया अॅडवायझर एसएम खान यांनी सांगितले की, 'त्यांच्या क्वार्टरमध्ये साधा टीव्हीसुद्धा नव्हता. ते फक्त रेडिओ आणि वर्तमानपत्रातून बातम्या जाणून घेत असतं.'