नाव PM मोदींनी सुचवलं, पण Operation Sindoor लोगोचं डिझाइन कुणी केलं? तुम्हालाही वाटेल अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:05 IST2025-05-27T15:03:04+5:302025-05-27T15:05:19+5:30
Operation Sindoor Logo Design Story: ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कुणी केले याचे डिझाइन, त्यामागील विचार काय होता? जाणून घ्या...

नाव PM मोदींनी सुचवलं, पण Operation Sindoor लोगोचं डिझाइन कुणी केलं? तुम्हालाही वाटेल अभिमान
Operation Sindoor Logo Design Story: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे. यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. संपूर्ण देशभरात ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. भारताच्या तिन्ही दलांनी गाजवलेल्या शौर्याबाबत देशातील जनता भरभरून बोलत आहे. परंतु, या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या लोगोचे डिझाइन कुणी केले? तुम्हाला याबाबत माहिती आहे का? जाणून घेऊया...
‘ऑपरेशन सिंदूर’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचवले होते. पण, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या लोगोचे डिझाइन कुणी केले, यासंदर्भात आता काही गोष्टी समोर आल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पर्यटक पुरूषांना लक्ष्य करण्यात आले. धर्म विचारून गोळीबार करण्यात आला. घरचा कर्ता पुरूष, पती गमावलेल्या महिलांच्या भावना व्यक्त करण्यासाठीच या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आले होते. त्यामुळे नावाला साजेसाच लोगो तयार करणेही तितकेच महत्त्वाचे होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव निश्चित झाल्यानंतर त्याचा लोगो तयार करण्याचे काम भारतीय लष्करातील दोन व्यक्तींच्या हाती सोपवण्यात आल्याचे म्हटले जाते. भारतीय लष्कराच्या मुख्यालयाच्या ऑपरेशन रूमने प्रसिद्ध केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कमांड सेंटरच्या पहिल्या दृश्यांमधून ऑपरेशन सिंदूरच्या लोगोच्या डिझाइनमागील व्यक्ती कोण हे उघड झाले आहे. या लोगोचे डिझाइन करण्याचे श्रेय लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह यांना जाते. त्या दोघांनी मिळून तयार केलेला हा लोगो केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
OPERATION SINDOOR लोगोमागील विचार काय?
काळ्या बॅकग्राऊंडवर मोठ्या ठळक अक्षरांमध्ये OPERATION SINDOOR असे लिहिण्यात आले. त्यातील सिंदूर शब्दातील एका ओ (O) मध्ये लाल रंगाचे कुंकू आहे. त्यातील काही कुंकू आजूबाजूला पसरल्याचेही दिसत आहे. या सांडलेल्या कुंकवातून पहलगाम हल्ल्यात आपला पती, जोडीदार गमावल्याचं महिलांचे दु:ख, वेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये सिंदूर किंवा कुंकू हे हिंदू महिला सुवासिनी असल्याचे प्रतीक आहे. ते पुसणे हे वैधव्याचे प्रतीक आहे. म्हणूनच, लोगोमध्ये पसरलेले कुंकू हे गमावलेल्या जोडीदारांना गमावलेल्या महिलांच्या दुःखाचे प्रतीक आहे. तर, न्याय मिळाला आणि भारताचा सूड घेण्याचा संकल्प यांचा संदेश या लोगोच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या लोगोच्या नावातील दुसरे ‘ओ’ (O) अक्षर हे लाल कुंकवाच्या वाटीसारखा आकार असलेला आहे. तो केवळ परंपराच नाही तर उत्कटता, शक्ती आणि क्रोधाच्या भावनांचे प्रतीक आहे, असा विचार या लोगोमागे असलेला पाहायला मिळतो.
दरम्यान, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने अनेक मार्गांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केले. भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात सुमारे १०० दहशतवादी मारले गेले. यानंतर भारत-पाक युद्धविराम करण्यात आला. परंतु, त्याच रात्री पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्या, त्यालाही भारताने उत्तर दिले आणि पाकिस्तानची दाणादाण उडवून दिली.