बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 05:54 IST2025-12-24T05:54:30+5:302025-12-24T05:54:39+5:30
बांगलादेशकडून भारतीय उच्चायुक्तांना पाचारण; राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत व्यक्त केली चिंता, दिल्ली-कोलकाताच्या बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या समर्थकांची निदर्शने, पोलिसांशी झाली झटापट

बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बांगलादेशात हल्लेखोरांनी दीपुचंद्र दास या हिंदू व्यक्तीला ठेचून मारल्याच्या निषेधार्थ हातात भगवे झेंडे घेऊन मंगळवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या समर्थकांनी कडेकोट सुरक्षा असलेल्या दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर तसेच शेकडो आंदोलकांनी कोलकाता येथील बांगलादेश उपउच्चायुक्तालयासमोर निदर्शने केली. दोन्ही ठिकाणी या आंदोलकांची पोलिसांशी झटापट केली.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना पाचारण केले. भारतातील बांगलादेशच्या दूतावासांच्या सुरक्षेबाबत त्यांच्याकडे तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव असद आलम सियाम यांनी ढाका येथे आपल्या कार्यालयात भारतीय उच्चायुक्तांना पाचारण केले. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयातील राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी भारताने तत्काळ योग्य ती पावले उचलावीत, असे सियाम यांनी सांगितले. गेल्या १० दिवसांत दुसऱ्यांदा प्रणय वर्मा यांना बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केले.
निदर्शक आणि पोलिसही जखमी
कोलकात्यातील निदर्शनप्रसंगी झालेल्या झटापटीत काही निदर्शक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. ‘बंगीयो हिंदू जागरण मंच’च्या नेतृत्वाखाली ‘हिंदू हुंकार पदयात्रा’ या नावाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या प्रकरणी १२ निदर्शकांना अटक करण्यात आली.
अशी केली दीपुचंद्र दास यांची हत्या
१८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मयमनसिंह येथील बलुका भागात कापड कारखान्यातील कामगार दीपुचंद्र दास यांना ईशनिंदेच्या आरोपावरून ठेचून ठार मारले व नंतर त्यांचा मृतदेह जाळण्यात आला. जमावाने दास यांना प्रथम कारखान्याबाहेर मारहाण केली. नंतर झाडाला लटकावून त्यांना फाशी देण्यात आली.
जमावाने मृतदेह ढाका-मयमनसिंह महामार्गाजवळ टाकून दिला आणि नंतर तो जाळला. दिल्लीत निदर्शकांनी सांगितले की, बांगलादेशात एका हिंदू व्यक्तीवर अमानुष हल्ला करून त्याची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही बांगलादेश सरकारकडे करत आहोत.
आंदोलकांनी बांगलादेश सरकारचा निषेध करणारे फलक हाती धरले होते. कोलकाता येथील बेकेबागान येथील बांगलादेश उपउच्चायुक्तालयासमोर निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असलेल्या निदर्शकांनी बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले.
८०० मीटरवर निदर्शकांना रोखले
दिल्लीत बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर निदर्शने करणाऱ्यांना पोलिसांनी मंगळवारी रोखून धरले. मात्र निदर्शकांनी बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या ठिकाणी दीड हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. बांगलादेश उच्चायुक्तालयापासून सुमारे ८०० मीटर अंतरावर या निदर्शकांना रोखण्यात आले. बांगलादेशात हिंदू महिलांचा छळ होत असल्याच्या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे जम्मू-काश्मीरमधील पीडीपी या पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी म्हटले आहे.
पत्रकारांचे जीव धोक्यात
बांगलादेशातील प्रसारमाध्यमे कठीण काळातून जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारा घाला तसेच पत्रकारांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे, असे त्या देशातील पत्रकारांनी सांगितले.
दी डेली स्टार या वृत्तपत्राच्या कार्यालयाला जमावाने तोडफोड करून आग लावली होती, अशी माहिती दी डेली स्टारचे संपादक व प्रकाशक महफूज अनाम म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा जगण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
हिंसाचार अतिशय निंदनीय : गुटेरेस
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, बांगलादेशमधील हिंसाचार अतिशय निंदनीय आहे. तिथे नुकतीच एका हिंदूची हत्या झाली. बांगलादेश किंवा अन्य कोणताही देश असो, तेथील अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटले पाहिजे.