खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप
By बाळकृष्ण परब | Updated: January 26, 2021 19:41 IST2021-01-26T19:38:36+5:302021-01-26T19:41:13+5:30
Farmer Protest : शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी गंभीर आरोप केले आहे.

खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणामुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे. आज सकाळी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाल्यावर या आंदोलनाला हिंसक वळण लागून शेतकरी आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत मुसंडी मारली. तसेच लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवला. दरम्यान, शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी गंभीर आरोप केले आहे.
आज शेतकरी आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराचा कट हा शीख फॉर जस्टीस या संघटनेने रचला होता, असा आरोप रवनीत सिंह बिट्टू यांनी केला आहे. तसेच लाल किल्ल्यावर झालेल्या आंदोलनात अभिनेता दीप सिद्धूचा हात होता असा दावाही बिट्टू यांनी केला आहे. तसेच धार्मिक ध्वज हा केशरी असतो, पिवळा नसतो, असे सांगत रवनीत सिंह बिट्टू यांनी लाल किल्ल्यावर फडकवलेल्या ध्वजाबाबतही मोठा दावा केला आहे.
दरम्यान, आज दिवसभर सुरू असलेल्या तणावादरम्यान, दिल्लीत अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले. अनेक ठिकाणी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले. तसेच आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडवल्याने तणावामध्ये अधिकच भर पडली होती.