Mahakumbh 2025 :उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभ मेळ्यात रविवारी संध्याकाळी अचानक आग लागल्याने अनेक टेंट जळून खाक झाले. रविवारी दुपारी चारच्या सुमारास सेक्टर १९ मध्ये ही आग लागली आणि काही वेळातच या आगीने उग्र रूप धारण केले. मात्र एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत ४० टेंट आणि ६ तंबू जळून राख झाले होते. सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात १९ जानेवारीला लागलेल्या आगीची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अचानक लागलेल्या आगीमुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र ठोस बंदोबस्तामुळे आग पसरण्यापासून रोखण्यात आली. सुमारे १५ ते २० मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. गीता प्रेस गोरखपूरच्या तंबूजवळ ठेवलेल्या सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली. मात्र आता खलिस्तान जिंदाबाद फोर्सने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. खलिस्तान जिंदाबाद फोर्सने एक ई-मेल पाठवून दावा केला की हा पिलीभीत चकमकीचा बदला आहे. २३ डिसेंबर रोजी पीलीभीत येथे झालेल्या चकमकीत उत्तर प्रदेश पोलिसांनी ३ खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
खलिस्तान जिंदाबाद फोर्स दहशतवादी संघटनेने कॅनडा आणि पंजाबमधील पत्रकारांना ई-मेल पाठवला आहे. कोणाचेही नुकसान करणे हा मुख्य उद्देश नव्हता, असं दहशतवादी संघटनेने म्हटलं आहे. "कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या दुहेरी स्फोटांची जबाबदारी खलिस्तान झिंदाबाद फोर्सने घेतली आहे. या कृत्याचा मुख्य उद्देश कोणालाही दुखावणे नव्हता. हा जोगींना इशारा होता की खालसा तुमच्या अगदी जवळ आहे आणि पिलीभीतमध्ये आपल्या तीन प्रिय भावांची हत्येच्या बनावट चकमकीचा बदला आहे. ही फक्त सुरुवात आहे," असं या ई-मेलमध्ये म्हटलं आहे. या ई-मेलमध्ये फतेह सिंग बागी याचे नाव लिहिले आहे.
चकमकीत सहभागी खलिस्तानी दहशतवाद्यांचा हस्तक फतेह सिंग बागी हा तरनतारनचा रहिवासी आहे. बागी शिक्षणासाठी परदेशात गेला होता. त्याचे वडील जोगिंदर सिंग आणि आजोबा दोघेही भारतीय सैन्यात होते. त्याच वेळी, बागीचा मोठा भाऊ गुरजित सिंग अजूनही भारतीय सैन्यात असून तो राजस्थानमध्ये तैनात आहे.