केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचा कहर, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:26 IST2025-09-18T15:25:48+5:302025-09-18T15:26:50+5:30
Brain-Eating Amoeba Cases: केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिस या दुर्मिळ आणि प्राणघातक आजाराने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मृत्युंची संख्या वाढत आहे.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचा कहर, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणे!
केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिस या दुर्मिळ आणि प्राणघातक आजाराने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मृत्युंची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामधून अनेक मृत्यू गेल्या काही आठवड्यात झाले असून, आरोग्य विभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
या वर्षी केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिसचे ६१ रुग्ण आढळले आहेत, ज्यामध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटले की, केरळला सार्वजनिक आरोग्याच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये या संसर्गाचे प्रमाण जास्त होते, परंतु आता संपूर्ण राज्यात अमीबिक इंसेफेलायटिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये ३ महिन्यांच्या बाळापासून ते ९१ वर्षांच्या वृद्धापर्यंत समावेश आहे.
अमीबिक इंसेफेलायटिस म्हणजे काय?
हा आजार नेगलेरिया फाउलेरी नावाच्या सूक्ष्मजीवामुळे होतो. हा सूक्ष्मजीव दूषित गोड्या पाण्यात, जसे की तलाव, नद्या, विहिरी आणि क्लोरीन नसलेल्या पाण्यात आढळतो. जेव्हा एखादी व्यक्ती दूषित पाण्यात पोहते किंवा डुबकी मारते, तेव्हा हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो. शरीरात शिरल्यानंतर, हा अमीबा थेट मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या पेशींवर हल्ला करतो. यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात आणि संसर्ग झपाट्याने पसरतो, ज्यामुळे मेंदूला गंभीर इजा होते.
जाणून घ्या लक्षणे
हा आजार सुरुवातीला सामान्य तापासारखा दिसतो, परंतु काही तासांतच तो गंभीर रुप धारण करतो. त्यात तीव्र डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलटी, मान ताठर होणे, वास आणि चवमध्ये बदल, गोंधळ, संतुलन बिघडणे आणि काही प्रकरणांमध्ये कोमामध्ये जाणे यांचा समावेश आहे. लक्षणे सुरू झाल्यानंतर साधारणतः ५ ते १८ दिवसांत मृत्यू होण्याची शक्यता असते.
कोणती काळजी घ्यावी?
तज्ज्ञांच्या मते, या संसर्गाचे पसरने अत्यंत वेगाने होते, त्यामुळे तातडीने निदान आणि उपचार न केल्यास रुग्णाला वाचवणे अत्यंत कठीण होते. यामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त आहे. हा आजार दुर्मिळ असला तरी तज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा आणि अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.