केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:18 IST2025-12-13T16:18:11+5:302025-12-13T16:18:47+5:30
Kerala Local Body Election Result: केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंत राज्यात नाममात्र अस्तित्व असलेल्या भाजपाने केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.

केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंत राज्यात नाममात्र अस्तित्व असलेल्या भाजपानेकेरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भाजपाने तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील डाव्या पक्षांची ४५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली आहे.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील १०१ जागांपैकी १०० जागांसाठी मतदान झाले होते. या १०० जागांपैकी ५० जागांवर भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएने विजय मिळवला. तर डाव्या पक्षांची आघाडी असलेल्या एलडीएफला २९ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील यूडीएफ ही आघाडी १९ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. तर २ जागांवर अपक्षांनी विजय मिळवला. त्यामुळे आता या महानगरपालिकेमध्ये एनडीएची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
तिरुवनंतपुरमन महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून डाव्या पक्षांची सत्ता आहे. तर तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे सातत्याने निवडून येत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या भागात आपला प्रभाव वाढवत असलेल्या भाजपाने येथील डावे पक्ष आणि काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढत हे ऐतिहासिक यश मिळवले आहे.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरामधील जनता आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरून प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले की,’धन्यवाद तिरुवनंतपुरम!’ तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळालेला जनादेश हे केरळच्या राजकारणाला मिळालेलं एक ऐतिहासिक वळण आहे. राज्याच्या विकासाच्या आकांक्षा केवळ भाजपाद्वारेच पूर्ण होऊ शकतात, याची जाणीव जनतेला झाली आहे. आमचा पक्ष या ऊर्जामय शहराच्या वाढीसाठी आणि येथील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी वाढवण्यासाठी काम करेल’, असे आश्वासनही नरेंद्र मोदी यांनी दिलं.