शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:16 IST2025-08-02T12:15:48+5:302025-08-02T12:16:32+5:30
अज्ञात व्यक्ती आणि गट शाळेच्या प्रमुखांची परवानगी न घेता शाळेच्या परिसरात प्रवेश करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय सरकारने घेतला आहे

शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
आंध्र प्रदेश सरकारने शाळा आणि परिसराबाबत कठोर निर्णय जारी केला आहे. राज्यातील शालेय शिक्षण संचालक विजय राम राजू यांनी शुक्रवारी हे आदेश लागू केलेत. यापुढे शालेय परिसरात राजकीय पक्ष, संघटनांशी निगडीत झेंडे, बॅनर अथवा इतर राजकीय साहित्य झळकावले जाणार नाहीत. कुठल्याही अज्ञात व्यक्तीला परवानगीशिवाय शाळेच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही असंही सांगण्यात आले आहे.
राज्यातील सर्व प्रादेशिक सहसंचालक आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पालक किंवा शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी) सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्ती किंवा समुहाला कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. जर एखाद्या व्यक्तीला काही योगदान अथवा साहित्य वाटप करायचे असेल तर त्यांना मुलांशी न बोलता, वर्गात प्रवेश न करता थेट शाळेच्या प्राध्यापकांकडे जमा करावे लागेल. त्याशिवाय कुठल्याही अज्ञात व्यक्तीला मुलांसोबत फोटोही घेता येणार नाही असं स्पष्ट केले आहे.
अज्ञात व्यक्ती आणि गट शाळेच्या प्रमुखांची परवानगी न घेता शाळेच्या परिसरात प्रवेश करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय सरकारने घेतला आहे. पालक आणि एसएमसी सदस्यांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना, शाळांना भेटवस्तू किंवा देणग्या देण्यासाठी देखील अज्ञात व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही कारण त्यामुळे चालू शैक्षणिक कार्यात व्यत्यय येतो. कोणत्याही तक्रारी किंवा सूचना फक्त प्रशासकीय कार्यालयातच सादर कराव्यात. कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही बाहेरील व्यक्ती किंवा संस्थेशी संपर्क साधण्याऐवजी थेट प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा असं आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व प्रादेशिक शालेय शिक्षण सहसंचालक आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतील सर्व संस्था प्रमुखांना आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांना या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून येत्या काळात अशी कोणतीही समस्या उद्भवू नये असं अधिकाऱ्यांनी सांगितले.