ओडिशामधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार प्रदीप मांझी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रदीप मांझी फोनवरुन आग लावण्यासाठी पेट्रोल व डिझेल तयार ठेवण्याचे आदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देत असल्याचे व्हिडिओच्या माध्यामातून समोर आले आहे.
ओडिशात नबरंगपूरमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी गुरुवारी नबरंगपूरमध्ये काँग्रेसने 12 तास बंदाची हाक दिली होती. याचदरम्यान प्रदीप मांझी कार्यकर्त्यांना फोन करुन पेट्रोल आणि डिझेल तयार ठेवा व तुम्हाला सुचना मिळाल्यानंतर सर्वत्र आग लावा अशा प्रकारचे आदेश कार्यकर्त्यांना देत होते. याचदरम्यान स्थानिक वृत्तवाहिनीचा कॅमेरा चालू असल्याने प्रदीप मांझी यांचे वादग्रस्त विधान कॅमेरात कैद झाले. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रदीप मांझी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही आणखी गप्प राहू शकत नाही. प्रथम कुंडलीतील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आता नबरंगपुरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केली. या सर्व प्रकरणानंतर सरकार अजूनही कोणतेच ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप प्रदीप मांझी यांनी केला. तसेच महात्मा गांधीजींच्या तत्त्वांचे पालन करून जेव्हा आपण गरिबांना न्याय मिळवून देऊ शकत नसल्याने आम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विचारांचा अवलंब करण्यास भाग पाडावं लागलं असल्याचे प्रदीप मांझी यांनी सांगितले.