चीनवर खडा पहारा, लष्कराला मिळाली अत्याधुनिक नाैका आणि स्वदेशी शस्त्रे, पाकवरही डोळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 07:00 IST2022-08-17T05:31:35+5:302022-08-17T07:00:40+5:30
विशेष म्हणजे, हे सर्व साहित्य संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. त्यात नव्या एक २०३ रायफलचाही समावेश आहे. पूर्व लडाखमध्ये चीनला उत्तर देण्यासाठी लष्कराची क्षमता यामुळे वाढणार आहे.

चीनवर खडा पहारा, लष्कराला मिळाली अत्याधुनिक नाैका आणि स्वदेशी शस्त्रे, पाकवरही डोळा
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कराला अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रे साेपविण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीमध्ये ही स्वदेशी हत्यारे सोपवली आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व साहित्य संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. त्यात नव्या एक २०३ रायफलचाही समावेश आहे. पूर्व लडाखमध्ये चीनला उत्तर देण्यासाठी लष्कराची क्षमता यामुळे वाढणार आहे.
लष्कराला साेपविलेल्या लष्करी सामग्रीमध्ये एन्टी पर्सनल माईन ‘निपुण’, एके-२०३ रायफल, एफ अन्सास रायफल्स, थर्मल इमेजर, रणगाड्यांसाठी आधुनिक दृष्टी यंत्रणा यांच्यासह ड्रोन्स यांचा समावेश आहे. नवी एके-२०३ रायफल आणि त्यामुळे सैन्यदलाला होणाऱ्या फायद्याचे सादरीकरणही सैनिकांकडून प्रात्यक्षिकाद्वारे संरक्षणमंत्र्यांसमाेर सादरीकरण करण्यात आले.
तसेच वास्तविक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी आणि चिनी सैन्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन्सही भारतीय सैन्यदलाला आज देण्यात आले आहेत. या ड्रोन्समुळे दुर्गम भागातील शत्रूराष्ट्रांच्या सीमा आणि सैन्यदलावर नजर ठेवता येणे आता भारतीय सैन्याला सहज शक्य होणार आहे.
लँडिंग क्राफ्ट असॉल्टचे प्रात्यक्षिक
पूर्व लडाखच्या सीमेजवळच्या पँगॉँग तलावामध्ये चीनकडून पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या ठिकाणी भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आव्हानांचा विचार करून लष्कराला दिलेल्या ‘लँडिंग क्राफ्ट असाॅल्ट’ नाैकेचे प्रात्यक्षिकही यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दाखवण्यात आले. या नाैकेत एका वेळी ३५ सशस्त्र सैनिक प्रवास करू शकतात. अत्यंत कमी वेळेत ते या तलावात कोणत्याही ठिकाणी पोहचू शकणार आहेत. अशा १२ नाैका लष्कराला मिळणार आहेत.