चेंगराचेंगरीनंतर काशीबुग्गा मंदिर भाविकांसाठी बंद; ८ महिलांसह ९ जणांचा गेलेला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:02 IST2025-11-03T13:58:32+5:302025-11-03T14:02:21+5:30
कार्यक्रमासाठी आयोजकांनी परवानगी घेतली नव्हती

चेंगराचेंगरीनंतर काशीबुग्गा मंदिर भाविकांसाठी बंद; ८ महिलांसह ९ जणांचा गेलेला बळी
काशीबुग्गा: आंध्र प्रदेशातील काशीबुग्गा येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील धार्मिक समारंभादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी हे मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. शनिवारी या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ महिला व एका मुलासह ९ ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत अनेक भाविकांची हाडे तुटली असून काही जणांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा मंदिरातील प्रवेश थांबवण्यात आल्याचे श्रीकाकुलम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहेत. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर असून इतर जखमींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मंदिरात कार्यक्रम घेण्यासाठी आयोजकांनी कोणतेही परवानगी घेतली नव्हती व पोलिस सुरक्षेसाठीदेखील अर्ज केला नव्हता. कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी २५ ते ३० हजार लोक एकत्र आले होते.
एवढे लोक एकत्र आले तर मी काय करू शकतो?
एकाच वेळी एवढे लोक एकत्र आले तर मी काय करू शकतो, असा सवाल करत श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराचे ९४ वर्षीय संस्थापक व पुजारी मुंकद पांडा यांनी या दुर्घटनेला आपण जबाबदार नसल्याचा दावा केला आहे. इतर दिवसांप्रमाणेच कमी लोक येतील, असे वाटल्यामुळे आपण पोलिसांना सूचना दिली नाही. नेमके काय झाले ते कळले नाही, त्यामुळे मी कळवले नसल्याचे पांडा म्हणाले.
नियमांचे पालन केले नाही
कोणताही कार्यक्रम असला तरी मंदिर किंवा धार्मिक संस्थांना त्यासंदर्भात माहिती पोलिसांना देणे अनिवार्य असते. मात्र, या मंदिर व्यवस्थापनाने सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही दुर्घटना उघडली. याप्रकरणी भादंविच्या विविध कमलाअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे रेड्डी यांनी सांगितले.