गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:10 IST2025-09-28T17:07:59+5:302025-09-28T17:10:15+5:30
Karur Stampede: प्रचंड गर्दी आणि विजयचं सभास्थळी उशिराने झालेलं आगमन हे करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमागचं कारण असल्याचा दावा प्राथमिक तपासामधून करण्यात येत होता. मात्र विजय याच्या तमिलगा वेत्री कझगम या पक्षाने मात्र या चेंगराचेंगरीबाबत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी
अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाच्या सभेमध्ये चेंगराचेंगरी होऊन सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये १० मुलांचाही समावेश होता. दरम्यान, प्रचंड गर्दी आणि विजयचं सभास्थळी उशिराने झालेलं आगमन हे या चेंगराचेंगरीमागचं कारण असल्याचा दावा प्राथमिक तपासामधून करण्यात येत होता. मात्र विजय याच्या तमिलगा वेत्री कझगम या पक्षाने मात्र या चेंगराचेंगरीबाबत वेगळीच शंका उपस्थित केली आहे. तसेच या चेंगराचेंगरीचा स्वतंत्र तपास करण्यात यावा यासाठी विजय याचा पक्ष मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर दाद मागणार आहे. ही दुर्घटना आकस्मिकपणे नाही तर पूर्ण कटकारस्थान रचून घडवून आणण्यात आली, असा आरोप टीव्हीके पक्षाने केला आहे. तसेच उपस्थित गर्दीवर दगडफेक आणि कार्यक्रम स्थळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. सेंथिलकुमार आज एक विशेष सुनावणी घेण्याची शक्यता आहे. या याचिकेमधून विजय याचा पक्ष टीव्हीकेला या चेंगराचेंगरीची चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही सार्वजनिक सभेचं आयोजन करण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विजय सभास्थळी पोहोचण्यापूर्वी नेमकी वीज गेली, तसेच अरुंद रस्ते आणि अचानक गर्दी वाढल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीमध्ये एकत्र आलेल्या लोकांची एकमेकांपासून ताटातूट झाली. तसेच महिला आणि मुलांचा श्वास गुदमरू लागला. तसेच चेंगराचेंगरीत सुमारे ४० लोकांचा बळी गेला. तर अनेक जण जखमी झाले.
या दुर्घटनेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झालेल्या विजय याला मोठा धक्का बसला आहे. घडलेल्या घटनेमुळे माझ्या मनावर मोठा आघात झाला आहे. मी खूप दु:खी आहे, असे विजयने दुर्घटनेनंतर आपल्या चाहत्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. त्याबरोबरच विजय याने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घो।णा केली आहे.