प्रेयसीच्या दारात पोहोचताच तरुणाने केला स्फोट; अवस्था पाहून घरच्यांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:08 IST2024-12-31T11:05:58+5:302024-12-31T11:08:26+5:30
कर्नाटकमध्ये एका तरुणाने स्फोटकांनी स्वतःला उडवून देत आत्महत्या केली आहे.

प्रेयसीच्या दारात पोहोचताच तरुणाने केला स्फोट; अवस्था पाहून घरच्यांना बसला धक्का
Karnataka Blast : कर्नाटकातून हादरवणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकात एका तरुणाने एका मुलीच्या घराबाहेर स्वत:ला उडवून दिले. २१ वर्षांचा तरुण एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात वेडा झाला होता. प्रेमात नकार मिळवल्यानंतर तरुणाने मुलीच्या घराबाहेरच स्फोट घडवून आत्महत्या केली. या सगळ्या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.
तरुणाने अल्पवयीन मुलीच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या स्वतःला उडवून दिले. तरुणाचे अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा याला तीव्र विरोध होता. या कारणावरून तरुणाने नाराज होऊन हे पाऊल उचलले. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून, मंड्या जिल्ह्यातील कालेनहल्ली गावात रविवारी सकाळी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र असे या तरुणाचे नाव होते.
रामचंद्रने जिलेटिनच्या कांड्यांनी (माइन डिटोनेटर) स्वत:ला उडवले. गेल्या वर्षी तो तरुणीसोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तीन महिने तो तुरुंगातही राहिला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने मुलीच्या कुटुंबाशी तडजोड केल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन महिन्यानंतर तुरुंगात सुटल्यानंतर रामचंद्राने या मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि त्यांच्यातील हे प्रकरण कोर्टाबाहेरच मिटल्याने त्याच्याविरोधातील खटला मुलीच्या कुटुंबियांनी मागे घेतला. कोर्टात खटला मागे घेतला गेल्यावर तो मुलीला फोन करू लागला. त्याने मुलीसोबत पुन्हा नातं सुरू ठेवले. मात्र कुटुंबियांना या सगळ्या प्रकाराची माहिती कळली. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी रामचंद्रापासून तिची सुटका करण्यासाठी तिने कायदेशीर वय पूर्ण केल्यानंतर लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
रामचंद्र हा नागमंगला तालुक्यातील शेजारील गावातील रहिवासी होता. मुलीच्या घरच्यांनी पुन्हा नकार दिल्याने तो संतापला होता. पोलिसांनी सांगितले की, रविवारी तो अचानक अल्पवयीन मुलीच्या घरासमोर आला. त्याने आणलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा घरासमोरच स्फोट केला. या स्फोटात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, मृताच्या कुटुंबाचा खाणकामाचा व्यवसाय होता आणि त्यातूनच त्यांना जिलेटीनच्या कांड्या मिळाल्या.